दुष्काळी लातुरातील ऊस उत्पादकांनी मिळवले 664 कोटी रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची चर्चा केवळ मराठवाडा, महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध देशात आणि परदेशातही सतत होत असते. पिण्याच्या पाण्यासाठी तरसणाऱ्या लातूरात यावर्षी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तब्बल 664 कोटी रुपये मिळवलेले आहेत. एकीकडे ही परिस्थीत असताना जिल्ह्यात दुष्काळ कसा म्हणावा अशी चर्चाही केली जात आहे. जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांची स्थिती मात्र बिकट आहे.

लातूर जिल्ह्यातील दुष्काळ कायमचा संपवायचा असेल तर जिल्ह्यात पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पिक पध्दतीत बदल करावा असे सातत्याने सांगितले जात आहे. परंतु केवळ ऊसामुळेच शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात असे म्हणणारा वर्ग आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील साखर कारखानदारी राजकीय पुढाऱ्यांच्या ताब्यात असल्याकारणाने या विषयावर चर्चाच होत नाही. लातूर जिल्ह्यातील दुष्काळ हा सतत चर्चिला जाणारा विषय आहे. केवळ लातूर जिल्ह्यातच, मराठवाड्यात, राज्यात नव्हे तर देशात आणि परदेशातही लातूर जिल्ह्याच्या दुष्काळाची चर्चा होत असते. खरे तर लातूरकरांसाठी ही शरमेची बाब आहे. महाराष्ट्रातील लातूर हे एकमेव शहर आहे जिथे रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला होता. यावर्षीही लातूर जिल्ह्यात पाण्यासाठी नागरीकांना वणवण भटकावे लागले. पाण्याअभावी जिल्ह्यात रब्बीची पेरणीही होऊ शकली नाही तरीही ऊस उत्पादक शेतकरी मात्र मालामाल झाले आहेत असेच म्हणावे लागेल. लातूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल 664 कोटी रुपये या दुष्काळातही मिळालेले आहेत.

मांजरा परिवारातील साखर कारखाने सध्या चालू आहेत इतर साखर कारखाने मात्र बंद पडलेले आहेत. खरीप पेरणीसाठी म्हणून गाळपासाठी ऊस दिलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याने 27 कोटी 3 लाख, रेणा सहकारी साखर कारखान्याने 19 कोटी 20 लाख , विलास सहकारी साखर कारखाना 22 कोटी 63 लाख, जागृती अलाईड इंडस्ट्रीज लि. 18 कोटी 85 लाख, विलास सहकारी साखर कारखाना युनिट 2 ने 13 कोटी 99 लाख रुपये असे तब्बल 102 कोटी रुपये वाटप केलेले आहेत.

यावर्षीच्या भीषण दुष्काळी परिस्थीतीमध्येही विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने 7 लाख 3 हजार मे.टन ऊसाचे गाळप केलेले आहे. रेणा सहकारी साखर कारखान्याने 5 लाख 17 हजार मे.टन, विलास सहकारी साखर कारखाना 6 लाख 13 हजार मे.टन, जागृती अलाईड इंडस्ट्रीज लि.5 लाख 38 हजार मे.टन, विलास सहकारी साखर कारखाना युनीट 2 च्या वतीने 3 लाख 76 हजार मे.टन असे एकूण 27 लाख 50 हजार मे. टन ऊसाचे गाळप या कारखान्यांनी केलेले आहे. यावर्षीच्या गळीत हंगामातील ऊस बिलापोटी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याने प्रति टन 2334 प्रमाणे 190 कोटी रुपये, विलास सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन 2318 प्रमाणे 143 कोटी रुपये, विलास सहकारी साखर कारखाना युनीट 2 ने प्रतिटन 2321 प्रमाणे 87 कोटी रुपये, रेणा सहकारी साखर कारखान्याने प्रति टन 2321 प्रमाणे 120 कोटी रुपये तर जागृती अलाईड इंडस्ट्रीज लि.च्या वतीने प्रति टन 2300 रुपये प्रमाणे 124 कोटी रुपये असे एकूण 664 कोटी रुपयांचे वाटप केलेले आहे.