
सामना प्रतिनिधी । मुंबई
अमूल, गोकुळ, मदर डेअरीनंतर आता महानंदच्या दुधाचा दरही वाढणार आहे. महानंद डेअरीच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच झाली आहे. त्यामध्ये शेतकऱयांच्या दुधाला 27 रुपये दर देण्याचा निर्णय घेतला. वाढीव बोजा डेअरीवर पडू नये म्हणून दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिल्याची माहिती डेअरीचे उपाध्यक्ष डी.के. पवार यांनी दिली.
दरम्यान, हा वाढीव दर कधीपासून लागू होणार हे अद्याप निश्चित झाले नसले तरी पुढील तीन-चार दिवसांत तो लागू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महानंदच्या सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सुमारे दोन लाख लिटर दुधाची विक्री होते. मात्र डेअरीने दुधाचा दर वाढवल्यास विक्रीत घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुधाचे वितरण करणे परवडणार नसल्याचे महानंद दूध वितरक आणि वाहतूकदार संघाने स्पष्ट केले आहे. वितरकांची ही मागणी धुडकावत डेअरीने दरवाढ केल्यास दूध न उचलण्याचा इशारा संघाने दिला आहे.





























































