
>> रजनीश राणे
संस्थाच जेव्हा माणूस बनते तेव्हा जगणे श्वासापलीकडे जाते. कणकवलीतील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानने ते केले आहे. ‘भिन्नरुचे ः जनस्य बहुधाप्येकं समराधानम’ असे कवी कालीदास याने म्हटले आहे. म्हणजे नानारुचि रसिकां दे केवळ नाटक पुरे समाधान. आचरेकर प्रतिष्ठानने केवळ समाधानच नव्हे, तर आनंद दिला आहे आणि तो आनंद तुम्हा-आम्हाला मिळतच राहणार… कारण राजेश खन्नाच म्हणाला होता… ‘आनंद कभी मरता नही!’
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कणकवली हे शहर तसे अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. परमपूज्य भालचंद्र महाराज आश्रमाशी आध्यात्मिक नाळ जोडली आहे, तर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोपुरी आश्रमामुळे सामाजिक भान जपलेले आहे. या दोन आश्रमांच्या मध्ये गडनदीच्या विस्तीर्ण किनाऱयावर आणखी एक आश्रम उभा आहे… गेली कित्येक वर्षे… कोकणातीलच नव्हे… तर महाराष्ट्रातील रंगकर्मींचा आधारवड ठरलेला आश्रम. कुठल्याही शहराची ओळख ही तेथील वाचनालयावरून ठरते असे म्हणतात. कणकवलीत नगरवाचनालय आहेच, पण विविध कलाक्षेत्रातील रंगकर्मींचा आश्रमही आहे. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान या आश्रमामुळेच कणकवलीची एक वेगळी ओळख अवघ्या महाराष्ट्रात आहे.
हा लेखनप्रपंच केवळ संस्था ओळख एवढय़ापुरता मर्यादित नाही. 1980 मध्ये ही संस्था स्थापन झाली आणि तीन पिढय़ांना कलादृष्टय़ा सजग करण्याचे काम या संस्थेने केले आहे. अमूक अमूक व्यक्ती ही संस्थाच बनली आहे, असे म्हणून त्या अमूक अमूकचा गौरव केला जातो. मात्र आचरेकर प्रतिष्ठान ही संस्था म्हणजे कणकवलीतील प्रत्येक कलाप्रेमी व्यक्ती बनली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
गेल्या 40 वर्षांत प्रतिष्ठानने केले काय तर जीवनाचा निकोप आनंद लुटण्यासाठी कणकवलीकरांना तयार केले आणि त्यांची रसिकता जागवली. या संस्थेने कुठल्याही कलेचा विटाळ मानला नाही. गेली चार दशके अव्याहतपणे सुरू असलेली नाथ पै एकांकिका स्पर्धा, गेली 26 वर्षे सुरू असलेला नाटय़ उत्सव, एकांकिका अभिवाचन स्पर्धा असो की संस्थेचा ताजा उपक्रम म्हणजे रंगभूमीविषयक त्रैमासिक ‘रंगवाचा’, हे सगळे उपक्रम राबवून संस्थेने सुजाण प्रेक्षक तयार केले. नाटक पाहायचे कसे हे शिकवले. मात्र एवढय़ापुरतेच हे कार्य मर्यादित नाही, तर वामनदाजी शास्त्र्ााrय संगीत स्पर्धा, रसग्रहण कार्यशाळा, गायन-वाचन मैफल अशी फक्कड मैफल जमवतानाच संस्थेने गडनदीच्या किनारी नाटकघर बांधले आणि एकांकिकांची बँकही स्थापन केली. एक नवी पिढी तयार करताना लहान मुलांसाठी सृजनाच्या वाटा हा उपक्रमही सुरू आहे.
प्रतिष्ठानचे हे कार्य खरोखरच अलौकिक आहे. कारण कणकवली म्हणजे काही अद्ययावत सोयी-सुविधांनी पुढारलेले शहर नव्हे. मागास निश्चित नाही, पण प्रगतही नाही. अशा छोटेखानी शहरात नाटय़ आणि कलाविषय जाणिवा जपत गेली चार दशके काम करत राहणे हे वाटते तितके सोपे नाही. दशावतारी नाटक, भजनाची डबल बारी नाहीतर गेला बाजार विशाल व्हिडिओ थिएटरमधील पडद्यावरचा सिनेमा बघण्यात हरवलेल्या कणकवलीकरांना आचरेकर प्रतिष्ठानने देशभरातील अनेक भाषांमधील अनेक नाटय़कृतींचे दर्शन घडवले. जयवंत दळवी, डॉ. श्रीराम लागू यांच्यापासून डॉ. राजीव नाईक यांच्यापर्यंत अनेक थोर रंगकर्मींनी कणकवलीत येऊन उभे-आडवे धागे विणले आणि त्याचे सुंदर वस्त्र्ा विणून त्याची मायेची ऊब कणकवलीकरांना दिली.
कणकवलीत 78वे नाटय़संमेलन झाले होते. त्याच्या आयोजनाची जबाबदारी अर्थातच संस्थेवर होती. या संस्थेला ज्योत्स्ना भोळे पुरस्कार, रंगमेळ आणि पाऊलखुणा पुरस्कार असे गौरविण्यात आले आहे. अमोल पालेकर, नसिरुद्दीन शाह हे तर प्रतिष्ठानचे फॅनच. अशा दिग्गजांना कणकवली दाखवली ती या संस्थेने आणि कणकवलीकरांना हे दिग्गज दाखवले ते या संस्थेनेच. आता बारशालाही सेलिब्रिटीला बोलवण्याची प्रथा आहे. सेलिब्रिटी आला की गर्दी जमणार, आपसूक प्रसिद्धी मिळणार हा त्या मागचा हेतू. मात्र आचरेकर प्रतिष्ठानने कणकवलीत आतापर्यंत शेकडो सेलिब्रिटी आणले ते केवळ प्रसिद्धी – गर्दी मिळवण्यासाठी नव्हे, तर दर्दी तयार करण्यासाठी!
प्रतिष्ठान म्हणजे वामन पंडीत असे एक समीकरण सर्वच रंगकर्मींना ठावूक आहे. नीटनीटके आयोजन ही पंडीत यांची खासीयत आणि त्या जोरावरच अनेक नव्हे, तर प्रत्येक उपक्रम यशस्वी झाला. संस्थेने अनेक नाटय़स्पर्धांमध्ये एकांकिका, नाटके केली आणि पारितोषिकेही पटकावली. अर्थात त्या प्रत्येक नाटकात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होता तो वामन पंडीत यांचा. असा हा नाटय़वेडा माणूस गेली काही वर्षे संस्थेची धुरा वाहतो आहे. आता नवी कार्यकारिणी झाली आहे. पंडीत अध्यक्ष आहेतच, पण त्यांच्या जोडीला ऍड. नानू देसाई आणि शरद सावंत हे पुढे सरसावले आहेत. मधु मंगेश कर्णिक, भाई बेळेकर, आनंद आळवे, सुरेश कोदे, प्रकाश कामत, अशोक करंबळेकर आदींनी लावलेले हे छोटेसे झाड आता आधारवड बनला आहे… सजग, सुजाण कणकवलीकरांचा आणि
राज्यातील तमाम रंगकर्मींचा!
प्रतिष्ठानबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे. पण थांबणे गरजेचे आहे. कारण अपूर्णतेत एक वेगळीच मजा असते. पूर्णत्वाच्या कल्पनेने कासावीस व्हायला होते आणि ते जाणून घेण्यासाठी धडपड सुरू होते. म्हणून थांबतो.





























































