
सामना प्रतिनिधी, देवरुख
रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील गणेश मंदीराजवळ रस्ता खचण्याचा प्रकार घडला आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन वस्तूस्थितीची पाहणी करत आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महामार्गावरुन सध्या एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. सोमवारपासून या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे बी. ए. पाटील यांनी दिली.
कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी साखरपा आंबाघाट हा जवळचा मार्ग आहे. या मार्गावरुन दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहनांची सतत ये जा सुरु असते. घाट चढत असतांना काही ठिकाणी उजव्या तर काही ठिकाणी डाव्या बाजूला खोल दरी आहे. अचानक गणेश मंदिराजवळील रस्ता सकाळपासून हळूहळू खचू लागला. याच बाजूला सर्वाधिक मोठी दरी असल्याने या घटनेची खबर वाहनचालकांनी लगेचच बांधकाम विभागाला दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाने घटनास्थळी धाव घेत वस्तुस्थितीची पाहणी केली. खबरदारी म्हणून रस्त्याच्या बाजूने खचलेल्या ठिकाणी दगड लावून पांढरे पट्टे मारण्यात आले. सध्या एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. पहिल्याच पावसात रस्ता खचल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबरोबरच घाटाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत बांधकाम विभागाच्या बी. ए. पाटील यांच्या जवळ संपर्क साधला असता, त्यांनी नैसर्गिकरित्या हा रस्ता खचला असून वाहतूक सुरळीत राहण्याबाबत कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा दिला आहे. याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याबाबत प्रस्ताव तयार करून वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला असून त्याला तत्काळ मंजुरी देखील मिळाली असल्याने सोमवारपासून हे काम प्रत्यक्ष सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.



























































