
सामना प्रतिनिधी, नांदेड
चारचाकी गाड्यांवर लावलेले काळे फिल्म आणि इतर रंगांचे फिल्म काढून घेण्यात पोलिसांनी कुचराई केली तर त्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केले असे घेण्यात येईल, असे आदेश महाराष्ट्र राज्य वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी 21 जून रोजी जारी केले आहेत.
चारचाकी किंवा त्यापेक्षा जास्त चाकी गाड्यांवर काळ्या किंवा इतर रंगांच्या फिल्म लावण्यासंदर्भाने अविषेक गोयंका यांनी सर्वोच्च न्यायालयात सन २०११ मध्ये जनहित याचिका क्रमांक 265/2011 दाखल केली होती. त्या याचिकेत न्यायालयाने दिनांक 24 एप्रिल 2012 रोजी दिलेल्या आदेशानुसार पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी सर्व सर्व पोलिसांना आदेशित केले होते की अश्या सर्व काळ्या आणि इतर रंगांच्या काळया फिल्म काढून टाकाव्यात आणि त्या वाहनांवर कडक कायदेशीर कार्यवाही करावी. हा आदेश दिनांक 4 मे 2012 रोजी पाठवलेला आहे.
आता तब्बल 9 वर्ष होत आली तरी तरीही वाहनांच्या विंडस्क्रीन आणि खिडक्यांवर तसेच काळ्या व इतर रंगाचे फिल्म लावलेले दिसतच आहेत.त्यानंतर एका समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीने राज्यातील आणि देशातील ज्या माणसांना झेड आणि झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.त्यांची वाहने या केंद्रीय मोटर वाहन कायद्यातून वगळली गेली आहेत. तेव्हा अश्या गाड्या वगळून इतर सर्व गाडयांना पुन्हा तपासावे आणि ज्या गाड्यांवर कोणत्याही प्रकारची फिल्म (VIT-Visual Light Transmission) लावलेले असेल ते अत्यंत त्वरित प्रभावाने काढून टाकावे आणि त्या वाहनांवर केंद्रीय मोटार अधिनियम1989 च्या नियम 100 (2) प्रमाणे कार्यवाही करावी,असे आपल्या आदेशात अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी नमूद केले आहे. आता या कामात राज्यातील कोणी पोलीस अधिकारी-कर्मचारी कुचराई करेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला असे मानले जाणार आहे.




























































