
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील कॉलिटी बेकरीत सकाळी ग्राहकांची प्रचंड गर्दी असतानाच आतील बॉयलर चा जबरदस्त असा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने कानठळ्या बसून संपूर्ण परिसर हादरून गेला आणि ग्राहक व कर्मचारी सैरावैरा पळत सुटले. स्फोटात तीन कर्मचारी जखमी झाले.
या स्फोटामुळे बेकरीतील सामानाचे तुकडे -तुकडे झाले. बेकरीतील महिला कामगार सरिता सवर्डेकर ही गंभीररीत्या जखमी झाली. तसेच मंगेश बाबाजी बंगाल याला किरकोळ दुखापत झाली. तहसीलदार जीवन देसाई ,पो.नि देवेन्द्र पोळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि माहिती घेत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
रविवारी सकाळी ९.३० वाजता बेकरीत ग्राहकांची गर्दी असतानाच कानठळ्या बसवणारा असा जबरदस्त आवाज आला.या आवाजा बरोबरच त्या इमारतीसह संपूर्ण परिसर हादरून गेला.एखादा भूकंप व्हावा आशा या आवाजाने बेकरीतील ग्राहक आणि कर्मचारी भयंकर घाबरले आणि सैरावैरा पळत सुटले. चिपळूण न.प चा अग्निशमन बंब मागवण्यात आला तर काहींनी धाडस करून बेकरीच्या किचनमध्ये प्रवेश केला तेव्हा येथील बॉयलर फुटून त्याचा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले.
स्फोट झाल्याचे निदर्शनास येताच चिपळूण नागरी पतसंस्थेचे कर्मचारी मदतीसाठी धावले.तसेच येथील रिक्षा चालक आणि नागरिकांनी देखील मदतकार्य सुरू केले. चिपळूण नागरीच्या कार्यकारी अधिकारी सपना यादव यांनी देखील येथील घाबरलेल्या महिलांना धीर दिला आणि जखमी सरिता सवर्डेकर हिला तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. किचनमध्ये काही ठिकाणी किरकोळ आग देखील लागली होती ती तत्काळ विझवण्यात आली. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली.
या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पूर्ण चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार जीवन देसाई यांनी दिले आहेत.




























































