हवामान खात्याची पलटी; मुंबईतून पावसाची कलटी! आता तारीख 26 जून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात मान्सून दाखल झाला असून अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पण मुंबई मात्र कोरडीच आहे. रत्नागिरीपासून कोल्हापूरपर्यंत मजल मारलेला मान्सून मुंबई-ठाण्यात कधी येणार, याकडे प्रत्येक जण चातकासारखे डोळे लावून बसला आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवणार्‍या हवामान खात्याने पुन्हा पलटी मारली आहे. आता कलटी मारलेला पाऊस 26 जून रोजी  मुंबईत दाखल होईल, असा नवा अंदाज वर्तवला आहे. आता तरी हा अंदाज खरा ठरेल की पाऊस पुन्हा टांग देईल, हे येत्या चार दिवसांतच स्पष्ट होईल. 

नेमकी का अडली मान्सूनची गाडी

दक्षिण गोव्यापासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत मान्सूनसाठी कमी दाबाचे क्षेत्र म्हणजेच अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे सध्या कोकणात पाऊस पडतोय. कमी दाबाचे हे क्षेत्र किंवा सिस्टीम पुढे उत्तर कोकणपर्यंत सरकल्यानंतरच मुंबईत खर्‍या अर्थाने पावसाला सुरुवात होईल.

पावसाचा अंदाज

वर्ष      अंदाज      प्रत्यक्षात   मुंबईत  आगमन

2018    28 मे     30 मे     9 जून

2017    30 मे     30 मे     11 जून

2016    6 जून    8 जून    20 जून

2015    30 मे     5 जून    14 जून

2014    2 जून    5 जून   12 जून

वर्ष      पाऊस  (टक्के)

2019   93

2018   91

2017   95

2016   97

2015    86

2014    88

येथे पाऊस पडतोय सेन्टिमीटरमध्ये

कोकण आणि गोवा

देवगड-8, मालवण-7, लांजा-5, संगमेश्वर-देवरुख-4, चिपळूण-4, रत्नागिरी-4.

मराठवाडा

फुलंब्री-11, गंगापूर-5, भोकरदन -5, भूम-5, विजापूर -4, बदनापूर-4, संभाजीनगर- 4.

मध्य महाराष्ट्र

कोपरगाव-13, नेवासा-7, कागल-6, पाथर्डी-6,
राहुरी -5, शिरगाव-5, भुसावळ-3, गगनबावडा-3,
शिरूर -3.