
सामना प्रतिनिधी । मुंबई
जून महिन्यातच चाहूल लागते ती गणरायाच्या आगमनाची… मूर्तीशाळेत गणराय आकार घेऊ लागतात, घराघरात-मंडळांच्या कार्यालयात स्वागताच्या तयारीची बैठक सुरू होते. गणेशमूर्ती कामाला आता कुठे सुरुवात झाली असतानाच लोअर परळच्या विशाल शिंदे यांच्या त्रिमूर्ती स्टुडियोमधील बाप्पा मात्र थेट ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराकडे रवाना झाले आहेत.
परदेशात गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. मूळचे धुळे येथील प्रशांत चौधरी हे मेलबर्नमध्ये आयटी प्रोफेशनल आहेत. विशाल शिंदे यांच्या बालगणेश रूपातील अनेक मूर्तींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी मुंबईतूनच बाप्पाची मूर्ती न्यायची असे प्रशांत चौधरी यांनी ठरवले. त्यानुसार नुकतीच बाप्पाची मूर्ती घेऊन ते मेलबर्नला रवाना झाले आहेत.
सोशल मीडियामुळे अनेक कलाकारांची कला सातासमुद्रापार पोहोचत आहे. सोशल मीडियात व्हायरल होणार्या फोटोंमुळे आमच्या मूर्तींना महाराष्ट्रासह देश-विदेशातून मागणी वाढत आहे. गतवर्षी आम्ही साकारलेली बाप्पाची मूर्ती इंडोनेशियाला रवाना झाली होती. – विशाल शिंदे, मूर्तिकार


























































