क्रिकेटचे भगवीकरण होत असल्याचा आरोप, नव्या जर्सीवरून राजकारण तापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 स्पर्धेत टीम इंडियाचा संघ इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भगव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून आता राजकारणही सुरू झाले आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी भगव्या जर्सीवर आक्षेप घेत मोदी सरकारवर टीका केली आहे.

abu-azmi

हिंदुस्थानी क्रिकेट संघाने दुसऱ्या देशांचा पराभव केल्यास मला आनंद होतो आणि मला त्यांचे कौतुक वाटते. परंतु मोदी संपूर्ण देशाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदुस्थानी क्रिकेट संघाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न सरकारकडून होतोय. या देशाच्या तिरंग्यामध्ये मुसलमानांचा हिरवा रंगही आहे, असा उल्लेख करत अबु आझमी म्हणाले की, तुम्हाला हिंदुस्थानी क्रिकेट संघाला कोणता रंग द्यायचा असेल तर या देशाच्या तिरंग्याचा रंग द्या. परंतु प्रत्येक गोष्ट भगव्या रंगात रंगवणार असेल तर हे अयोग्य आहे. देशासमोर चुकीचा संदेश जात आहे, तसेच जनतेने याचा विरोध करायला हवा असे आवाहनही त्यांनी केले.

आझमी पुढे म्हणाले की, मोदी सरकार देशाचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. देशात विकास नाही, बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढली आहे, डॉलरचा भाव वाढत आहे. मात्र सरकार हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाला भगवा रंग देत आहे. त्याला तिरंग्याचा रंग द्यावयाला हवा, असे अबू आझमींनी म्हटले.