
सामना ऑनलाईन । मुंबई
उरी चित्रपटात मेजरची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलने त्याच्या अभिनयाने साऱ्या देशातील जनतेची मनं जिंकली आहेत. या चित्रपटानंतर विकी एका रात्रीत सुपरस्टार झाला. विकी कौशल हा पुन्हा एकदा लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. 1971च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धाचे महानायक फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका तो साकारणार आहे. दिग्दर्शिका मेघना गुलजार या माणेकशॉ यांच्या जीवनावर चित्रपट तयार करत असून त्यांनी मुख्य भूमिकेसाठी विकीची निवड केली आहे. विकीने आज या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
‘राझी चित्रपटाचे शूटींग सुरू असताना मी या चित्रपटाविषयी विकीला सांगितले होते. या चित्रपटाच्या ड्राफ्टिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर मी विकीला फोन केला व भेटायला बोलावले. त्यावेळी पुन्हा एकदा त्याला या चित्रपटाविषयी सांगितले व स्क्रिप्ट वाचायला दिली. मात्र विकीने स्क्रिप्ट न वाचताच चित्रपटाला होकार दिला. तरीही मी त्याला स्क्रिप्ट वाचण्यास सांगितले. त्याला ही स्क्रिप्ट फार आवडली आहे, असे मेघना यांनी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
विकीने आज माणेकशॉ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सोशल मीडियावर चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातंच त्याला हजारो लाईक्स मिळाले असून चाहत्यांना विकीचा हा लूक खूप आवडला आहे. ‘मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की मला हिंदुस्थानचा एका निडर देशभक्त फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा जीवनपट दाखविण्याची संधी मिळत आहे’, अशी पोस्ट विकीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.या चित्रपटाच्या चित्रीकरणाला 2021 मध्ये सुरुवात होणार आहे.


























































