लेख : संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत दुपटीने वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
indian army weapons

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन ([email protected])

हिंदुस्थानच्या संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत दुपटीने वाढ झाल्याची माहिती नुकतीच समोर आली. 2017-18 या वर्षातील 4 हजार 682 कोटींच्या निर्यातीवरून झेप घेत देशाने 2018-19 मध्ये 10 हजार 745 कोटींच्या संरक्षण सामग्रीची निर्यात केली. या वाढीकरिता देशाच्या नेतृत्वाची आश्वासक नीती कारणीभूत आहे. जगात शस्त्रास्त्रांचा व्यापार वाढतो आहे. कारण शस्त्रास्त्रांचा प्रत्यक्षात वापर करण्याची वेळ येण्याची किमान शक्यता असली तरी आपण शस्त्रसज्ज असण्यामुळे युद्धाची शक्यता कमी होते. नव्या तंत्रज्ञानामुळे सुसज्ज शस्त्रास्त्रांची गरज निर्माण होत असते.

हिंदुस्थानात अत्याधुनिक शस्त्रास्त्र निर्माण का होत नाहीत स्वातंत्र्यानंतरच्या 66 वर्षांत आपण 70 टक्के मोठी शस्त्रास्त्रs परदेशातून आयात करत होतो. आपल्या देशात शस्त्र निर्माण करू शकत नाही ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद नव्हती. संरक्षण सिद्धतेच्या बाबतीत आधुनिकीकरणाच्या पातळीवर हिंदुस्थान दहा वर्षे मागे आहे. सर्व प्रकारची विमाने, रणगाडे, बहुतेक सगळ्या मोठय़ा बोटी, पाणबुडय़ा हे सर्व आयात केले जातात. फक्त रायफल, लाईट मशीनगन यासारखी छोटी शस्त्र देशात तयार होतात. त्याची किंमत फार कमी असते. आपल्याकडचे संरक्षण मंत्रालय आणि शास्त्रज्ञ अशा प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्र बनवण्यास गेल्या 66 वर्षांत अपयशी ठरले होते.

स्वातंत्र्यानंतर संरक्षणविषयक धोरण ठरविताना डीआरडीओ (डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) या संस्थेची स्थापना करण्यात आली. याद्वारे शस्त्रास्त्रांसंदर्भात संशोधन करून शस्त्रास्त्रनिर्मिती केली जाईल असे ठरवण्यात आले. यासाठी हिंदुस्थानातील शास्त्रज्ञांची भरती करण्यात आली आणि शास्त्राrय संशोधन सुरू झाले, परंतु इतक्या वर्षांत डीआरडीओला कुठलीच मोठी शस्त्र तयार करण्यात यश मिळालेले नाही. त्याची तीन मोठी उदाहरणे म्हणजे ‘अर्जुन नावाचा रणगाडा’ , ‘तेजस नावाचे लढाऊ विमान’, ‘अरिहंत नावाची अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी’.

डीआरडीओचे मुख्य काम आपल्या देशात परदेशापेक्षा कमी किंमतीत अत्याधुनिक शस्त्र बनवणे आहे. संशोधनानंतर अमाप पैसा खर्च केल्यावरसुद्धा आपण 70 टक्के शस्त्र परदेशातून आणतो.

हिंदुस्थानची शस्त्रास्त्रांची गरज अमेरिका, रशिया, इस्रायल, फ्रान्स वगैरे देशांकडून भागवली जाई, पण शस्त्रास्त्रांचा धाक विरोधकांवर बसविण्याबरोबरच आर्थिकदृष्टय़ा सक्षम होणेही हिंदुस्थानसाठी आवश्यक होते आणि ही क्षमता संरक्षण सामग्रीच्या निर्मितीत, तिच्या व्यापारात निर्यातीमुळे वाढू शकते. 2014 साली सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने त्या दिशेने प्रयत्न केले. दिवंगत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण क्षेत्राशी संबंधित निर्णय धडाडीने घेतले. जुलै 2018 मध्ये भुवनेश्वरमध्ये पर्रीकरांनी विधान केले की, “हिंदुस्थानला संरक्षण क्षेत्रातील निर्यातीचे केंद्र करण्याचे ध्येय सरकारने समोर ठेवले आहे. तसेच मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा 70 टक्क्यांपर्यंत असलेली हिंदुस्थानची संरक्षण क्षेत्रातील आयात कमी कमी करत ती 40 टक्क्यांपर्यंत आणि निर्यात दोन अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. ‘मेक इन इंडिया’, थेट परकीय गुंतवणूक आदी उपाययोजनांच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचू.’’ पर्रीकरांनी आपल्या कार्यकाळात हिंदुस्थानच्या संरक्षण सामग्रीच्या निर्यातीची रूपरेषा तयार केली होती. आज पर्रीकर हयात नसले तरी त्यांनी केलेल्या नियोजनाप्रमाणे हिंदुस्थानची वाटचाल सुरू असल्याचे वाढलेल्या निर्यातीवरून स्पष्ट होते.

हिंदुस्थानची निर्यात नेमकी कोणत्या संरक्षण सामग्रीत वाढली आणि कशामुळे वाढली, तसेच हिंदुस्थानला या क्षेत्रात किती व्यापक संधी आहे आणि आणखी काय काय करण्याची गरज आहे हेही जाणणे महत्त्वाचे आहे. हिंदुस्थान सध्या संरक्षण क्षेत्रात कम्पोनंट्सची किंवा शस्त्रास्त्रांच्या घटकांची, छोटय़ा हत्यारांच्या सुटय़ा भागाची सर्वाधिक निर्यात करतो. हिंदुस्थानातील कमी उत्पादन खर्च आणि केंद्र सरकारने निर्यातविषयक धोरणात आणलेली सुलभता तसेच ऑफसेट क्लॉजमधील सुधारणांमुळे निर्यातीत वृद्धी झाली.

हिंदुस्थान जवळपास पाच हजार कोटींची निर्यात एकटय़ा अमेरिकेला करतो, जी सर्वाधिक आहे. त्यानंतर इस्रायल व युरोपीय संघाला निर्यात होते. दुसरीकडे संरक्षण मंत्रालयाने सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांना कम्पोनंट निर्यातीच्याही पुढे जाऊन जिथे मूल्यवर्धन केले जाऊ शकते, अशा व्यासपीठावर जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याचाही निर्णय घेतला आहे. सोबतच निर्यातवाढीसाठी नवीनच ‘जनरल एक्स्पोर्ट लायसन्स प्लॅन’ तयार केला आहे, ज्यामुळे हिंदुस्थानी कंपन्या सुलभतेने संरक्षण सामग्रीची, उपकरणांची निर्यात करू शकतील.

हिंदुस्थानकडे या क्षेत्रात प्रचंड संधी आहे, पण त्यांचा लाभ कसा घ्यायचा? रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट, प्रॉडक्शन फॅसिलिटी, क्वॉलिटी स्टॅण्डर्ड या क्षेत्रात हिंदुस्थानला सध्या गुंतवणुकीची गरज आहे, जेणेकरून या क्षेत्रातील संधींचा फायदा करून घेता येईल. अत्याधुनिक संशोधन केलेल्या संशोधनात अधिक सुधारणा आणि ते जमिनी स्तरावर कसे कार्यान्वित करता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. सध्या डीआरडीओ, इस्रो वगैरे संस्थांत अशी कामे होतात, पण अन्य संस्थांचाही सहभाग वाढवला पाहिजे.

डीआरडीओने मोठी शस्त्र बनवण्यावर लक्ष केंद्रित करावे, शस्त्र कमी किमतीमध्ये आणि दिलेल्या वेळेमध्ये बनवावीत, शस्त्रांचा दर्जा इतका चांगला असावा की, बाहेरचे देश अशी शस्त्र विकत घेतील. आज अमेरिकेच्या प्रयोगशाळा, नासा, मायक्रोसॉफ्टमध्ये संशोधन करणारे 30 टक्के हिंदुस्थानी आहेत. अशा हुशार शास्त्रज्ञांना डीआरडीओमध्ये आणता येईल का? जर आपण प्रयत्न केला आणि रामाराव समितीने सांगितलेल्या सुधारणा केल्या तर डीआरडीओ एक पांढरा हत्ती न राहता जागतिक दर्जाची प्रयोग संस्था बनून आधुनिक शस्त्र देण्यात यशस्वी बनू शकेल.

उपकरणांची, साहित्यांची निर्मिती करणाऱयांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा म्हणजे कच्चा माल, दळणवळणाची साधने, कौशल्यधारी मनुष्यबळ उपलब्ध करून देणे अतिशय गरजेचे आहे. तयार केलेल्या उत्पादनांचा दर्जा राखणे, जागतिक बाजारात त्याचा खप होईल अशी उच्च गुणवत्ता सातत्याने आपल्या उत्पादनांत उतरवली पाहिजे. याव्यतिरिक्त एक्स्पोर्ट कम्प्लायन्स प्रोग्राम आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सची सुरक्षाही गरजेचीं आहे. अशा प्रकारे नियोजनबद्ध रीतीने संरक्षण क्षेत्रात हिंदुस्थानने पावले उचलली तर जगाची बाजारपेठ नक्कीच हिंदुस्थानी उत्पादनांच्याही आवाक्यात येईल. हिंदुस्थानने इतर क्षेत्रांसह संरक्षण क्षेत्राच्या निर्यातीत पण प्रगती करावी. हिंदुस्थान क्षेपणास्त्रांसह युद्धनौकाही निर्यात करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहे. मागच्या आठवडय़ात संरक्षण मंत्रालयाने आगामी पाच वर्षांत अब्ज डॉलर्सची निर्यात करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. यामुळे हिंदुस्थानला संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत अन्य बडय़ा राष्ट्रांच्या पंगतीत जाण्याची संधी आहे.