
सामना प्रतिनिधी । नाशिक
गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने महापालिकेने येत्या रविवारपासून एकवेळ पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. पावसाअभावी पाणीसाठ्यात वाढ झाली नाही, तर येत्या दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे, याबाबतचा निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणीपातळीने तळ गाठला. असलेला अत्यल्प साठा हा जुलै अखेरपर्यंत टिकविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठवडय़ात महापौरांसह अधिकाऱ्यांनी धरणावर जावून पाहणी केली. त्यानंतर तयार करण्यात आलेल्या अहवालावर अधिकारी व महापालिकेतील पदाधिकारी, सर्वपक्षीय गटनेत्यांची आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात आज शुक्रवारी बैठक झाली. त्यावेळी पाणी कपातीवर निर्णय घेण्यात आला. ज्या भागात दोनवेळ पाणीपुरवठा होत आहे, तेथे रविवारपासून एकवेळ पुरवठा होईल. जेथे एकवेळ पुरवठा होता, त्यातही पंधरा टक्के कपात करण्यात येणार आहे. मंगळवारपर्यंत धरण क्षेत्रात पाऊस पडला नाही आणि पाणीसाठ्यात वाढ झाली नाही, तर दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
रविवारपासून जलतरण तलावही बंद ठेवण्यात येतील. बॉटलींग प्लँट, तसेच बांधकामांनाही पाणी बंद करण्यात येणार आहे. या बैठकीला महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, सभागृह नेते सतिश सोनवणे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, काँग्रेसचे शाहू खैरे, गुरुमित बग्गा, नंदिनी बोडके, दीक्षा लोंढे, जगदीश पाटील, सरिता सोनवणे आदी हजर होते.


























































