नगरमध्ये पाच दिवसात 44 टँकर बंद, अजूनही 574 गावांना पाणीपुरवठा टँकरने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाचे आगमन झाल्याने त्याचा परिणाम टँकरच्या संख्येवर झाला आहे. गेल्या पाच दिवसात जिल्ह्यामध्ये 44 टँकर बंद झाले आहेत. 24 जून रोजी जिल्ह्यात 873 टँकर सुरू होते. त्याद्वारे 603 गावे व तीन हजार 400 वाड्यावस्त्यांवरील 14 लाख 56 हजार 540 नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. तर, सध्या जिल्ह्यामध्ये 829 टँकर सुरू असून त्याद्वारे 574 गावे व 3 हजार 327 वाड्यावस्त्यांवरील नागरिकांसाठी पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

गेल्या 17 वर्षांचा विचार करता गतवर्षी जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे भूजल पातळीमध्येही कमालीची घट झाली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून जिल्हा प्रशासनातर्फे टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यंदा टँकरच्या संख्येने गेल्या 17 वर्षांतील उच्चांक गाठला होता. आतापर्यंत टँकरची सर्वाधिक संख्या 2016 मध्ये 826 इतकी होती. यंदा ही संख्या 873 पर्यंत गेली होती. 24 जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यात सर्वात जास्त टँकर पाथर्डी तालुक्यात सुरू होते. या तालुक्यात 152 टँकरद्वारे 114 गावे व 606 वाड्यावस्त्यांवरील नागरिकांसाठी पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, या तालुक्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने टँकरची संख्याही झपाट्याने कमी होऊ लागली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये पाथर्डी तालुक्यातील 35 टँकर बंद करण्यात आले आहेत. या तालुक्यात सध्या 117 टँकर सुरू आहेत. याशिवाय गेल्या पाच दिवसांमध्ये शेवगाव तालुक्यातील 8 व श्रीगोंदा तालुक्यातील 1 टँकर बंद झाले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास टँकरची संख्या अजून कमी होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.