चिपळूणमध्ये तिवरे धरण फुटले; 24 जण वाहून गेले, 11 जणांचे मृतदेह सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुर्गेश आखाडे | चिपळूण

वेळ रात्री 9.30 वाजताची… तिवरे गावातील भेंडेवाडीमधील शेतकरी कुटुंबीय नेहमीप्रमाणे जेवणासाठी बसलेले. अशातच तिवरे धरण फुटले आणि काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. पाण्याच्या प्रचंड लोंढय़ात वाडीतील 13 घरे वाहून गेली आणि चिपळूणमध्ये एकच हाहाकार उडाला. धरणाच्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की, 24 माणसे, गुरे-ढोरे, घरे वाहून गेल्याने सर्वांचे संसार उद्ध्वस्त झाले. घटनास्थळी जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून (एनडीआरएफ) मदत कार्य सुरू असून 11 जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर एनडीआरएफकडून बचावकार्यात बळीराम कृष्णा चव्हाण यांना जिवंत वाचवण्यात यश आले आहे.

चिपळूण तालुक्यापासून 35 कि.मी. सह्याद्रीच्या उंच डोंगरावर तिवरे गाव वसले आहे. डोंगर भागात वसलेली ही भेंडेवाडी धरणाखाली 100मीटर परिसरात वर्षानुवर्षे राहत आहे.  चार दिवस कोसळणार्‍या पावसामुळे तिवरे धरण भरून ओसंडून वाहत होते आणि मंगळवारी रात्री 9.30च्या सुमारास हे धरण फुटल्याने भेंडेवाडीवासीयांसाठी ती रात्र काळरात्र ठरली. फुटलेल्या धरणाच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की  धरणातून 12 किमी लांब परिसरात मृतदेह हाती लागले.

चिपळुणात तिवरे हे अतिशय दुर्गम गाव. तालुक्याच्या एका टोकाला असलेल्या तिवरे धरणाच्या पायथ्याशीच भेंडेवाडी आहे. मंगळवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास भेंडेवाडीतील ग्रामस्थांचे जेमतेम जेवण आटोपले होते. त्याचवेळी मोठा आवाज झाला. कुणाला काही कळण्याच्या आतच भेंडेवाडीला पाण्याने गिळले होते. फक्त आवाज ऐकून काही जण पळत सुटले, पण पाण्याच्या प्रवाहात सापडले ते वाहून गेले. काही लोक डोंगराच्या दिशेने धावले ते बचावले. धरण फुटल्याची घटना प्रशासनाला कळताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह प्रशासकीय अधिकारीवर्ग घटनास्थळी पोहचला. रात्र असल्यामुळे कुणालाच काही अंदाज येत नव्हता. सुमारे पाऊण तास हा जलप्रपात सुरू होता.

घरदार सारे वाहून गेले

तिवरे धरणातून बाहेर पडलेल्या पाण्याने आठ घरे चौथर्‍यासकट वाहून गेली. त्या आठ घरांची जागा धरणातील भलेमोठे दगड आणि गाळाने गिळून टाकली. काही घरांचा अर्धा भाग वाहून गेला आहे. धरण फुटण्याचा आवाज ऐकून जीव मुठीत घेऊन पळालेल्या कृष्णा धाडवे यांच्या घरातील सर्व सामान पाण्याच्या लोंढय़ाबरोबर वाहून गेले. कृष्णा धाडवेच्या घरात भिंतीवर फक्त फोटो लटकताना दिसत होते.

गाव संपर्कहीन

21 व्या शतकात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तिवरे गावात कोणत्याही मोबाईलला नेटवर्क नाही. अतिशय दुर्गम अशा गावात मोबाईल टॉवर नसल्यामुळे दुर्घटनेनंतर संपर्क साधण्यात अडचणी आल्या. एनडीआरएफच्या पथकाला संपर्कासाठी तात्पुरती यंत्रणा उभी करावी लागली. गावात दोन मोबाईल टॉवर उभे आहेत, पण ते कधी सुरू होणार असा प्रश्नही यावेळी उपस्थित झाला. गावातील रस्ता, एक कॉजवे, गणपतीचे मंदिर वाहून गेले.

त्या मृतदेहांसाठी स्मशानही ठेवले नाही

तिवरे धरण फुटून भेंडेवाडीत मृत्यूचे तांडव झाले. घरदारं तर नष्ट करताना पाण्याच्या लोंढय़ाने स्मशानही नष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी घेतला मदतकार्याचा आढावा

रत्नागिरी जिह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. यासंदर्भातील मदतकार्याचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून या घटनेस जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मदतकार्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडून सुरू असलेल्या मदतकार्याची त्यांनी माहिती घेतली. या दुर्घटनेची चौकशी करून पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नजीकच्या गावांना सतर्कतेचा इशारा

तिवरे बॅडवाडीतील काही घरे पाण्याखाली गेली आहेत. ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे, सती, गाणे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिवरे धरण फुटल्याने नजीकचा दादर पूलही पाण्याखाली गेला.

मृत्यू डोळ्यांसमोर दिसला

धरणापासून काही अंतरावर अंजली आणि अनंत पुजारे यांनी एक वर्षापूर्वी टुमदार घर बांधले होते. मुलगा पुण्यात नोकरीला असल्याने हे वयोवृद्ध दांपत्य त्या घरात राहत होते. रात्री 9.30 च्या सुमारास अनंत पुजारे हे टीव्हीवर बातम्या पाहत होते. त्याचवेळी त्यांना मोठा आवाज ऐकू आला. त्यांनी पत्नी अंजलीला काहीतरी झालेय असे सांगत ते गॅलरीत आले. त्यावेळी पाण्याचा लोंढा त्यांच्या घराच्या दिशेने येताना दिसला. दोघेही घाबरले. कोणत्याही क्षणी आपण वाहून जाऊ या भीतीने देवाचा धावा सुरू केला. घराचा डाव्या बाजूचा भाग पाण्याने गिळला होता. पाऊण तासानंतर पाण्याच्या प्रवाह कमी झाला. त्यानंतर घरातील सर्व सामान वाहून गेले तरी आपण वाचलो याची जाणीव झाली. अनंत पुजारे यांनी धरण फुटताना आम्ही आमचा मृत्यू डोळय़ांसमोर पाहिला, पण आता आमचा हा दुसरा जन्म आहे, अशी भावना व्यक्त केली.

धरणाच्या गळतीच्या तक्रारी

20 वर्षांपूर्वीच्या तिवरे धरणातून यंदा गळती होत होती. या गळतीबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रशासनाकडून फारशी दखल घेतली नसल्यामुळे ही दुर्घटना घडली.

21 वर्षांपूर्वीही कोकणात फुटणार होते धरण

राजापूर 21 वर्षांपूर्वीही कोकणात पाचल दिवाळवाडी धरण फुटून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. परंतु अतिवृष्टीमुळे धरणाला तडे गेल्याचे आजूबाजूच्या गावांतील लोकांना दिसल्यानंतर त्यांनी धरणात मातीच्या पिशव्या टाकून धरणाची गळती रोखल्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती.

आजोबांकडे होता म्हणून वाचला

रवींद्र चव्हाण त्यांची पत्नी, दोन मुले आणि पाहुणी आलेली काकी हे सर्व पाण्यात वाहून गेले. त्यांचा एक मुलगा प्रतीक हा गुहागर तालुक्यात नरवण येथे आजोबांकडे राहत होता तो वाचला.

एसआयटीमार्फत चौकशी करून  दोषींवर कारवाई

तिवरे येथे धरण फुटून 23 जणांचा मृत्यू झाला ही घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेबाबत एसआयटीने संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. ज्यांची घरे वाहून गेली आहेत त्यांना चार महिन्यांच्या आत घरे बांधून दिली जातील, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज कामथे येथे केले. सोबतच यातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकास मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे, असेही सांगितले. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, आमदार राजन साळवी उपस्थित होते.

पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे बळी

आम्ही वारंवार पत्रव्यवहार करूनही पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री 9 च्या दरम्यान आमची माणसे जेवायला बसली होती ती तशीच वाहून गेली. यामध्ये माझे वडील आणि चुलत्यांचा समावेश असल्याचे तानाजीराव चव्हाण यांनी सांगितले. या घटनेत माझे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे, याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

 

देवा तू मला कशाला ठेवलंस – राधिका आजीचा टाहो

काल नातू आला होता म्हणून 85 वर्षांच्या राधिका चव्हाण खेर्डीत राहायला गेल्या होत्या. त्यांना आपले घर वाहून गेल्याचे कळताच त्या धावत धावत आल्या, पण वाटेत त्यांनी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेला सिलिंडर पाहत टाहो फोडला. ‘देवा, हे काय केलेस, तू मला एकटीला मागे ठेवलंस, परवाच हा सिलिंडर मी घेतला होता. आता काय माझं सर्व गेलं’ असे म्हणत 85 वर्षांच्या आजीचे रडणे अंगावर काटा आणत होते.

‘आई आपण पुन्हा घर बांधू’

बचावलेल्या पुजारे कुटुंबाला भेटण्यासाठी ग्रामस्थ आले असताना अचानक समोरून पुजारे यांचा मुलगा धावत आला. त्याने आईला मिठी मारताच अश्रूंचा बांध फुटला. आपले घरातले सगळे वाहून गेले असे आईने सांगताच आई, आपण पुन्हा घर बांधू असा धीर देत तो मुलगा बोलत होता.

बेपत्ता झालेले…

अनंत चव्हाण (63), अनिता चव्हाण (58), रणजित चव्हाण (15), ऋतुजा चव्हाण (25), दूर्वा चव्हाण (दीड वर्ष), आत्माराम चव्हाण (75), लक्ष्मी चव्हाण (72), नंदाराम चव्हाण (65), पांडुरंग चव्हाण (50), रवींद्र चव्हाण (50), रेश्मा चव्हाण (45), दशरथ चव्हाण (20), वैष्णवी चव्हाण (18), अनुसिया चव्हाण (70), चंद्रभागा चव्हाण (75), शारदा चव्हाण (48), संदेश धाडवे (18), सुशील धाडवे (48), रणजित काजवे (30), राकेश घाणेकर (30).