पब्जीसाठी चार मुलांनी घर सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भोपाळ

पब्जीच्या नादात मध्य प्रदेशातील भोपाळच्या चार मुलांनी चक्क घर सोडल्याची घटना घडली. पब्जीचे मिशन पूर्ण करण्यासाठी दोन भाऊ आणि दोन बहिणी घरातील एक लाख रुपये घेऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यापैकी एक मुलगी 15 वर्षांची तर दुसरी मुलगी 13 वर्षांची आहे. एक भाऊ 11 वर्षांचा तर दुसरा अवघ्या 9 वर्षांचा आहे.

पब्जी खेळताना एकच लाइफलाइन उरली. हा खेळ पुढे सुरू ठेवण्यासाठी 500 मीटर अंतर पार करून जाण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ही सर्व मुले मध्यरात्री सर्वजण झोपले असताना गुणा रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळून गेली. याबाबत मुलांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुणा गावापासून 250 किलोमीटरवर असलेल्या ग्वाल्हेर स्थानकाजवळ ही सर्व मुले पोलिसांना सापडली. त्यांना घरी आणण्यात आले असून त्यांचे समुपदेशन सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.