
सामना ऑनलाईन, मुंबई
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांच्या पिढीने कठोर परिश्रमाने जी विचारांची बीजे रोवली त्याची फळे आज आपण चाखतो आहोत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे नवभारताचं स्वप्न पाहत आहोत, जो विकासाचा सपाटा आज पाहायला मिळतोय त्याचा पाया अटलबिहारी वाजपेयी यांनी रचला, असे गौरवोद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना जागविणाऱ्या अटलस्मृती उद्यानाचा शानदार लोकार्पण सोहळा आज बोरिवली येथे पार पडला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उद्यानामुळे अटलजींचा जीवनप्रवास जिवंत झाला. नवीन पिढीला हे विचार प्रेरणादायी ठरतील, असे उद्गार प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह येथे पार पडलेल्या सोहळ्यात मान्यवरांनी काढले.
मैदान न सोडता लढत राहतो तो मर्द
शिवसेना-भाजपची पूर्वापार चालत आलेली युती ही निवडणुका जिंकण्यासाठी होती. सभेला गर्दी व्हायची, पण प्रत्येक वेळी विजय मिळालाच असं नाही, पण पराभव झाला तरी चालेल. आज हरलो, पण उद्या त्यांना हरवणार हा विश्वास अटलजींनी दिला. तेव्हा भाजपचे दोन खासदार आले त्याही वेळी भाजपच्या अध्यक्षांनी पक्ष सोडला नाही, असा टोला विरोधकांना लगावतानाच अटलजींनी कधी मैदान सोडले नाही. मैदान न सोडता लढत राहतो तो मर्द, म्हणूनच अशा मर्दाची पूजा पिढय़ान पिढय़ा होत राहते, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
यावेळी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर शिक्षणमंत्री आशीष शेलार, राज्यमंत्री योगेश सागर, अविनाश महातेकर खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, प्रकाश सुर्वे, महापालिका विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्ष संध्या दोशी, विभागसंघटक सुजाता शिंगाडे आदी उपस्थित होते. यावेळी शाखा क्र. 11 च्या वतीने शाखाप्रमुख सुबोध माने आणि नगरसेविका रिद्धी खुरसुंगे यांनी 1 लाख 11 हजारांचा धनादेश शेतकरी मदतनिधीसाठी उद्धव ठाकरे यांच्या सुपूर्द केला. यावेळी विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस यांनी उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्र्यांना गदा भेट दिली.
असे आहे अटलस्मृती उद्यान
बोरिवलीतील शिंपोली टेलिफोन एक्स्चेंजसमोर अटलस्मृती उद्यान साकारण्यात आले आहे. अटलजींच्या भव्य पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर संसदेची प्रतिकृती असलेली इमारत साकारण्यात आली आहे. या स्मृती उद्यानात अटलजींच्या कविता, त्यांची भाषणे ऐकता येतील अशी सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात अटलजींनी तुरुंगवास भोगलेली कोठडी, पंतप्रधान असतानाचे त्यांचे कार्यालय, त्याचप्रमाणे अटलजींच्या उपस्थितीत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे अनोखे ऑडिटोरियम साकारले आहे.
हा ईव्हीएमचा घोळ नाही, तर अटलजींच्या विचारांना फुटलेले धुमारे
तेव्हा विजय दुरापास्त होता. मात्र त्यावेळी अटलजींनी जे पेरलंय ते आज उगवतंय. तेव्हा मतं कुठे मिळत होती. मतं कुठे जाताहेत हे कळत नव्हतं. मात्र त्यावेळच्या पराभवाचं रूपांतर हे आजच्या विजयात झालं. विरोधक ईव्हीएमचा घोळ, ईव्हीएमचा घोळ म्हणून टीका करीत आहेत. पण हे त्यावेळच्या त्या महान व्यक्तींच्या विचारांना फुटलेले धुमारे आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले. ही माणसं नव्हती, तर ती अद्भुत व्यक्तिमत्त्वं होती. त्यांच्या विचारांना पुढे न्यायचं असेल तर त्यांच्या विचारांचं पठण करून पुढे जाऊ शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जगाला हिंदुस्थानची आवश्यकता हे अटलजींनी ठणकावले – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले, अटलजींचे व्यक्तिमत्त्व अथांग सागरासारखे व उत्तुंग हिमालयासारखे आहे. ते निःस्पृह होते तसेच कमालीचे कणखरही होते. याकेळी मुख्यमंत्र्यांनी पोखरण येथे घेण्यात आलेल्या अणूचाचणीचे उदाहरण दिले. त्याआधीही भारताची अणूचाचणी घ्यायची तयारी होती; परंतु अटलजींनी जगाचे निर्बंध झुगारून अणूचाचणी करण्याचे धाडस केले. जागतिक दबाक भारताला रोखू शकत नाही हे त्या अणूचाचणीमधून त्यांनी जगाला दाखवून दिले. ‘आमच्या देशाची लोकसंख्या शंभर कोटी असून आम्हाला जगाची आवश्यकता नाही, जगाला आमची आवश्यकता भासेल’, असे अटलजींनी जगाला ठणकावून सांगितले, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उद्यानाजकळून जी मेट्रो लाईन जात आहे त्या स्थानकाला अटल स्मृती उद्यान मेट्रो स्थानक असे नाव देण्याची घोषणा केली.
विरोधकांना गदा गदा हलवू
मुख्यमंत्री आणि मला गदा भेट देण्यात आल्या आहेत. मात्र या गदा एकमेकांवर उगारण्यासाठी नाहीत, तर या गदांनी आम्ही विरोधकांना गदा गदा हलवू. कोणत्याही कार्यकर्त्याच्या हक्कांवर गदा येऊ देणार नाही, अशी मिश्कील टिपणी उद्धव ठाकरे यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.




























































