
सामना प्रतिनिधी । हिंगोली
ज्यांच्यावर अन्याय झाला त्याची दखल घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम मातोश्रीने नेहमीच केले आहे. महिलांचा सन्मान व आदर शिवसेनेत राखला जातो. जिल्ह्यातील बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यासाठी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन दुष्काळग्रस्त हिंगोली जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणार नाही, यासाठी सर्वजण कामाला लागू या, असे आवाहन शिवसेनेच्या महिला आघाडी हिंगोली जिल्हा संपर्क संघटक व महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी केले.
महिला आघाडी संपर्क संघटक म्हणून नियुक्ती झाल्यावर ज्योती ठाकरे यांनी पहिल्यांदाच हिंगोली जिल्हा दौरा केला. यानिमित्ताने संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा शिवरानी प्रकाश नरवाडे, महिला व बालकल्याण सभापती रेणुका भानुदास जाधव, जिल्हा परिषद सदस्या मंगला कांबळे, सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे, राजेंद्र शिखरे, रेखा देवकते, सारिका खिल्लारे, जिल्हा परिषद गटनेते अंकुश आहेर, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, सुनील काळे, संदेश देशमुख, अलका कुरवाडे, बाळासाहेब मगर, माजी नगराध्यक्षा जया अनिल देशमुख, नगराध्यक्षा सविता चोंडेकर, महिला आघाडी जिल्हा संघटक कीर्ती लादनिया, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे, संतोष देवकर, जी. डी. मूळे, गोपु पाटील आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मार्गदर्शन करताना संपर्क संघटक ज्योती ठाकरे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारानुसार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांनी नेहमीच महिलांना सन्मान दिला आहे. शिवसैनिक हे संघटनेतील सर्वात मोठे पद आहे. कार्य कर्तृत्वाला वाव देणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे. मातोश्रीच्या आश्रयाला जाणारा कधीच निराश होऊन परतत नाही. ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांची अडचण व अन्याय दूर करण्याचे काम शिवसेना व मातोश्रीने केले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन वाढविण्यासाठी व महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला जिल्हाभरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
























































