
सामना प्रतिनिधी । लंडन
माजी विश्वविजेता हिंदुस्थान आणि न्यूझीलंड हे संघ प्रथमच विश्वचषक क्रिकेट लढतीच्या उपांत्य फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तर 44 वर्षांनंतर विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत गतविजेता ऑस्ट्रेलिया व यजमान इंग्लंड संघ यंदा झुंजणार आहेत. गुणतालिकेत टॉपवर राहणार्या टीम इंडियाचा उपांत्य मुकाबला 9 जुलैला चौथ्या स्थानावरील न्यूझीलंडशी मँचेस्टरमध्ये रंगेल, तर दुसर्या उपांत्य लढतीत तिसर्या स्थानावरील यजमान इंग्लंड 11 जुलैला दुसर्या स्थानी असणार्या ऑस्ट्रेलियाशी बार्ंमगहॅम येथे दोन हात करील.
क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत उपांत्य लढतीत हिंदुस्थान व न्यूझीलंड हे दोन संघ एकमेकांसमोर आले नव्हते. यंदा प्रथमच तो योग आला आहे. उभय संघांतील साखळी लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाली होती. ऑस्ट्रेलियन संघ परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडविरोधात 44 वर्षांनंतर उपांत्य लढतीत उभा ठाकणार आहे. यापूर्वी 1975च्या विश्वचषक उपांत्य लढतीत हे उभय संघ एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 4 विकेट्सनी मात करीत अंतिम फेरीत धडक मारली होती.
उपांत्य लढतींचा कार्यक्रम
9 जुलै 2019, हिंदुस्थान वि. न्यूझीलंड, मँचेस्टर,
11 जुलै , ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड बार्ंमगहॅम
वेळ : दुपारी 3 पासून
- वर्ल्डकप उपांत्य लढतीत कांगारूंचा यश दर 100 टक्के
- गतविजेता ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आपल्या 8व्या सेमीफायनलमध्ये झुंजणार आहे.
- या संघाने आतापर्यंत सर्व 8 उपांत्य लढती जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
- दुसरीकडे यजमान इंग्लंड सहाव्यांदा उपांत्य लढतीत खेळणार आहे. इंग्लंडने 5 उपांत्य लढतींपैकी 3 जिंकल्या असून 2 लढतीत पराभव पत्करला आहे.
- यजमान इंग्लंड 1991 ला प्रथम वर्ल्डकप उपांत्य फेरीत पोचला. मात्र 3 वेळा फायनल खेळूनही या क्रिकेट निर्मात्या देशाला एकदाही विश्वचषक जिंकता आलेला नाही.
- टीम इंडियाची 7वी तर न्यूझीलंडची 8वी सेमीफायनल
- टीम इंडिया यंदा आपली वर्ल्डकपची 7वी सेमीफायनल खेळणार आहे. याआधी सहापैकी 3 वेळा हिंदुस्थानला विजय तर 3 वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. टीम इंडियाने 1983 आणि 2011 असे दोनदा क्रिकेटचे विश्वविजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला आहे.
- न्यूझीलंडने आठव्यांदा उपांत्य फेरीत मजल मारली असून त्यांना केवळ 1 वेळच यश लाभले आहे. 2015 च्या विश्वचषक अंतिम लढतीत न्यूझीलंड अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र तिथे बलाढय़ ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभूत व्हावे लागले होते.

























































