
>> प्रभाकर पवार
काँग्रेसला रामराम ठोकून स्वतःच्या ‘स्वाभिमानी’ या पक्षाची स्थापना करणारे व भाजपपुरस्कृत खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेलेले नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे (वय वर्षे 37) यांनी गेल्या आठवडय़ात (4 जुलै रोजी) मुंबई-गोवा महामार्गावर आपल्या 50 कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महामार्गावरील खड्डय़ांविरोधात आंदोलन केले. काँग्रेसच्या तिकिटावर 2014 साली प्रथमच महाराष्ट्र विधानसभेवर कणकवली मतदारसंघातून निवडून गेलेल्या नितेश राणे यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करायला कुणाचीच हरकत नव्हती; परंतु नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना तेथील गडनदीला दोरीने बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाने भरलेल्या बादल्या ओतल्या व त्याचे व्हिडीओ शूटिंग करून ते व्हायरल केले. हा अत्यंत संताप आणणारा विकृत प्रकार कुणालाही आवडला नाही. खुद्द नारायण राणे यांनीही आपल्या कनिष्ठ पुत्राचा हा कारनामा पाहून जाहीरपणे माफी मागितली आहे. प्रकाश शेडेकर यांची नितेश राणे यांनी असंस्कृत भाषेत संभावना केली. सभ्यतेचा किंचितही लवलेश नसलेल्या नितेश राणे व त्यांच्या 50 पाठीराख्यांविरोधात कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली तेव्हा त्यांना त्याच दिवशी टेबल जामीन होऊन त्यांची सुटका होईल असे वाटले होते; परंतु जिल्हा न्यायाधीशांनी त्यांना व त्यांच्या साथीदारांना जामीन देण्याऐवजी त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली. राणे पुत्रावर पोलीस कोठडीत जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रस्ते खराब असतील, त्यांना खड्डे पडले असतील, अपघात होत असतील तर त्यासाठी एका अधिकाऱ्याला जबाबदार धरून चालणार नाही. त्यासाठी सारी यंत्रणा कारणीभूत असते. संबंधित अधिकाऱ्यावर चिखलफेक करणे, त्याला मारहाण करणे, त्याला बेइज्जत करून समाजातून उठविणे हे योग्य नाही. ज्या अधिकाऱ्यावर अशी वेळ येते तेव्हा त्याच्या कुटुंबीयांची मानसिक स्थिती काय होत असेल याचा कधी राजकारण्यांनी विचार केला आहे का? क्षणिक प्रसिद्धीसाठी तुम्ही आपल्या पाचपन्नास समर्थकांना सोबत घेऊन कुठेही हल्ला करता, कुणालाही मारहाण करता हे आपल्या लोकशाहीप्रधान देशाला शोभत नाही. उद्या अशीच परिस्थिती तुमच्यावर आली तर?
पाशवी मनुष्यबळाच्या जोरावर आज आपल्या देशात काहीही केले जात आहे. कुणालाही भररस्त्यात कपडे काढून नग्न केले जात आहे. Mob Lynching ने तर साऱ्या देशात कहर केला आहे. कोणतीही हिंसा आपल्या देशाला तारू शकणार नाही. आजपर्यंत हिंसेने कोणतेच प्रश्न सुटलेले नाहीत. अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या नितेश राणे यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी राजपत्रित अधिकारी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पोलीस म्हणा किंवा राजपत्रित अधिकारी म्हणा, त्यांच्यावरील अलीकडील वाढते हल्ले पाहता आता त्यांनाच पोलीस संरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. नितेश राणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यातील चित्र फारच भयावह वाटत आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जात आहे. भ्रष्टाचार कोणताही एकटा अधिकारी करीत नाही. ती एक साखळी असते. त्यात सर्वांचा वाटा असतो. अगदी मंत्रालयापर्यंत. मग एकटय़ा शेडेकरसारख्या सामान्य अधिकाऱ्याला फासावर चढवून तुम्ही काय मिळविणार आहात?
राजकीय पुढारी आपल्या Paid समर्थकांना सोबत घेऊन आंदोलन करीत असतात; परंतु सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, दंगल, कट करणे, जीवे ठार मारण्याच्या धमक्या देणे अशा आरोपांखाली जेव्हा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होतात, अटक होते तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. त्या समर्थकांना आपण काय करून बसलो याचा पश्चात्ताप होतो. कारण केस रजिस्टर झाल्यावर पासपोर्ट व व्हिसा मिळत नाही. नोकरीही गुन्हा दाखल झाल्यामुळे नाकारली जाते. कोर्टात सतत वर्षानुवर्षे फेऱ्या माराव्या लागतात. त्यावेळी कोणताही पुढारी केसेस अंगावर घेणाऱ्या तरुणांच्या मदतीला धावून येत नाही. आजच्या तरुण पिढीने राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या हिंसक पुढाऱ्यांच्या मागे लागून आपले आयुष्य बरबाद करून घेऊ नये. आज सीसी टीव्ही फुटेजमुळे तुमचा ऍक्ट, तुमची कृती उघड होते. त्यामुळे हे सारे पुरावे तुम्हाला शिक्षा होण्यासाठी पुरेसे असतात. तेव्हा कोणत्याही हिंसक, तोडफोडीच्या आंदोलनात भाग घेण्यापूर्वी आजच्या तरुण पिढीने दहा वेळा विचार केला पाहिजे. सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांना मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे. राजकीय पुढाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले तर ते भविष्यात सत्ताधारी मागे घेतात; परंतु त्यात भाग घेणाऱ्या तरुणांना मात्र अशा खटल्यांचा प्रचंड त्रास होतो. आज संसद असो, विधानसभा असो अथवा पालिका असो, या सभागृहांमध्ये कायदे बनविणारे खासदार, आमदार, नगरसेवकच आज हिंसक कारवाया करीत आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होत आहेत आणि त्यात आजची तरुण पिढी भरडली जात आहे, याचे दुःख वाटते. राजकीय फायद्यासाठी राजकारण्यांकडून बेरोजगार तरुणांचा वापर केला जातो. आंदोलनात भाग घेणाऱ्यांना वकील व पैसा पुरवून त्यांची सुटकाही केली जाते; परंतु पोलीस दफ्तरी दाखल झालेल्या गुह्यांचे काय? हा डाग कधीच पुसला जात नाही. लोकशाही मार्गाने मोर्चा काढणे, निदर्शने करण्याइतपत ठीक आहे; परंतु सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान करणे, शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला करणे, त्यांची धिंड काढणे हे प्रकार या देशाला विनाशाकडे नेणारे आहेत.
























































