1055 पैकी 927 खड्डे बुजवले, 24 तास तक्रार करण्याची सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

गेल्या काही दिवसांत मुंबईत होणाऱया अतिवृष्टीमुळे रस्त्यांवर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र पालिकेच्या माध्यमातून हे खड्डे तातडीने भरले जात असून गेल्या एका महिन्यात आलेल्या 1055 तक्रारींपैकी तब्बल 927 तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. पालिकेने रस्त्यांवरील खड्डय़ांसह पावसाळ्यात निर्माण होणाऱया समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये व्हॉटस्ऍप क्रमांक, ट्विटर आणि पालिकेच्या वेबसाइटवर 24 तास तक्रार दाखल करण्याची सुविधा निर्माण करून दिली आहे.

पावसाळ्याच्या आधी पालिका बहुतांशी रस्त्यांची कामे पूर्ण करते, मात्र या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रस्त्याची कामे रखडली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने नागरिकांना 24 तास आपल्या तक्रारी ऑनलाइन नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये व्हॉटस्ऍप, ट्विटरवर तक्रार नोंदवल्यास पुढील 48 तासांत तक्रारीवर संबंधित विभाग अधिकाऱयांमार्फत कार्यवाही केली जात आहे. या वर्षी पालिकेला 10 जूनपासून 9 जुलैपर्यंत खड्डय़ांबाबत 1055 तक्रारी प्राप्त झाल्या. यातील 87 टक्क्यांहून जास्त तक्रारी सोडवल्या असल्याचे पालिका अधिकाऱयाने सांगितले. खड्डय़ांबाबत पालिकेच्या ‘एमसीजीएम X 24’ या वेबसाइटवर तक्रारी आल्या आहेत.

कोल्डमिक्स ठरतेय वरदान
रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका या वर्षीही ‘कोल्ड मिक्स’चा वापर करीत आहे. कोल्डमिक्समुळे भरपावसात खड्डे बुजवण्याचे काम करता येत आहे. पावसाळ्यासाठी वरळी प्लाण्टमध्ये अडीच हजार टन कोल्डमिक्स तयार करण्यात आले आहे. वॉर्डच्या आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार हे कोल्डमिक्स वितरितही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या काळात परदेशातून आणले जाणाऱया कोल्डमिक्ससाठी 127 रुपये खर्च येत होता. मात्र आता पालिका हे कोल्डमिक्स स्वतः तयार करीत असल्यामुळे हे कोल्डमिक्स फक्त 27 रुपयांत उपलब्ध होत आहे.

अशा केल्या उपाययोजना
– प्रत्येक वॉर्डमध्ये तक्रारीसाठी व्हॉटस्ऍप क्रमांक
– तातडीच्या कामांसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये स्पेशल इंजिनीयर आणि कर्मचाऱयांची टीम
– ‘एमसीजीएम-24 तास’ कार्यरत
– रस्त्याच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक – 1800221293
– प्रत्येक वॉर्डमध्ये फलक लावून जनजागृती

सर्वाधिक खड्डे अंधेरीत
पालिकेकडे आलेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी के-पूर्व म्हणजे अंधेरीमधून आल्या असून यात 160 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. याशिवाय ए विभाग – 14, बी- 18, सी- 24, डी- 20, इ- 18, एफ साऊथ- 45, एफ नॉर्थ – 28, जी साऊथ – 32, जी-नॉर्थ – 15, एच पूर्व – 29, एच पश्चिम – 20, के पश्चिम-76, एल – 45, एम पूर्व – 36, एम पश्चिम – 33, एन-45, पी साऊथ – 91, पी नॉर्थ – 44, आर साऊथ – 42, आर सेंट्रल – 20, आर नॉर्थ – 71, एस – 76, टी – 53 अशा तक्रारी पालिकेकडे नोंदवण्यात आल्या आहेत.