
सामना ऑनलाईन, पणजी
गोव्यात रजिस्टर्ड लग्न करायचे असेल तर दांपत्याने एचआयव्ही टेस्ट करून घेणे आता बंधनकारक होणार आहे. असा निर्णयच गोवा सरकारने घेतला असून तशा स्वरूपाचा कायदा विधानसभेत सादर करणार असल्याचे गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी पणजीत सांगितले. गोव्याच्या कायदा विभागात आम्ही हा प्रस्ताव पाठवलेला आहे. एकदा का तिथे हा प्रस्ताव मंजूर झाला की, आम्ही तो विधानसभेत येत्या पावसाळी अधिवेशनातच सादर करणार आहोत, असेही राणे यांनी पुढे स्पष्ट केले. 2006 साली तेव्हाच्या काँग्रेस सरकारनेही अशा प्रकारचा कायदा प्रस्ताव आणला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.



























































