हरणाच्या पाडसाला जीवदान, पाण्याचा शोधात पडले कोरड्या विहीरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

औसा तालुक्यातील तपसे चिंचोली गावालगत विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला येथील शेतकरी सखाराम काळे यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले आहे. बुधवारी  दुपारी 1 च्या दरम्यान सखाराम काळे यांच्या शेतात हरणांचा कळप पाण्याच्या शोधात विहिरीच्या जवळ जवळ आला होता. पाऊस नसल्याने  वन्यप्राण्यांना  चारा आणि पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

अचानक त्या कळपातून एक छोटं पाडस त्या विहिरीत पडले. ते लहान पिल्लू असल्याने घाबरून गेले होते. विहिरीचा भाग हा प्रचंड खडकाळ असल्याने त्या  पिल्ल्याच्या पायाला जखम झाली होती. सखाराम काळे व दिलीप नेटके  यांनी तत्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवले त्याच वेळी वनकर्मचारी राहुल शिंदे,बालाजी कांबळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

दोरीच्या साहाय्याने  विहिरीत उतरून त्या पाडसाला वर काढण्यात आहे. या हरणाची पाहणी करून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले.