37 वर्षांनंतर गिरगावच्या देवळेकर कुटुंबीयांना मिळाले हक्काचे घर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रतिंद्र नाईक । मुंबई

परवडणाऱ्या दरात घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाने पुनर्विकासात गमावलेले घर देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्षानुवर्षे हक्काच्या घरासाठी म्हाडा कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही घर नाकारणाऱ्या म्हाडाला अखेर मुंबईच्या सत्र न्यायालयाने चांगलाच दणका दिला. कोणतेही पैसे न स्वीकारता याचिकाकर्त्यांना घर द्या असे आदेश न्यायालयाने म्हाडा प्रशासनाला दिले. न्यायालयाच्या या दणक्यानंतर ताळ्यावर आलेल्या प्रशासनाने लोअर परळ येथील सदनिका याचिकाकर्त्यांना देऊ केली असून तब्बल 37 वषच्या न्यायालयीन लढय़ानंतर गिरगावात राहणाऱ्या देवळेकर कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 काळबादेवी परिसरात राहणाऱ्या देवळेकर कुटुंबीयांची जागा पुनर्विकासासाठी म्हाडाने 1978-79 साली ताब्यात घेतली. तीन वर्षांत त्या ठिकाणी इमारतही बांधली, परंतु त्या इमारतीतील घरे लहान-मोठी बांधल्यामुळे रहिवाशांनी घरे स्वीकारण्यास नकार दिला. यावर उतारा म्हणून म्हाडा प्रशासनाने या रहिवाशांना एकाच इमारतीत दोन घरे दिली. तेथेच राहणाऱ्या देवळेकर कुटुंबीयांना म्हाडाने एक घर दिले, पण त्यांच्या वाटणीचे दुसरे घर दिलेच नाही. म्हाडा कार्यालयात खेटय़ा मारूनही देवळेकर कुटुंबीयांना घर देण्यास म्हाडाने नकार दिला. अखेर देवळेकर यांनी दाद मागण्यासाठी ऍड हिमांशू टक्के यांच्यामार्फत सिटी सिव्हिल कोर्टात सूट दाखल केले. त्यावेळी न्यायालयाने पुरावे पाहता याचिकाकर्त्यांना 2002 साली घर देण्याचे आदेश दिले, परंतु म्हाडाकडून चालढकल सुरूच होती. अखेर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात आले. न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने याप्रकरणी पुन्हा सत्र न्यायालयात यावर सुनावणी घेण्याचे आदेश दिले. त्यावेळी सत्र न्यायालयाने दिरंगाईबद्दल म्हाडा प्रशासनाचा समाचार घेत 2 जुलै 2018 रोजी देवळेकर यांना त्यांच्या घराचा ताबा देण्याचे आदेश दिले. अखेर म्हाडाने गेल्या महिन्यात देवळेकर यांना लोअर परळ येथील एका सदनिकेचा ताबा दिला.

ट्रान्झिट कॅम्पमध्ये फरफट

पुनर्विकासादरम्यान म्हाडाने देवळेकर यांना प्रतीक्षानगरच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवले, परंतु त्या इमारतींचीही दयनीय अवस्था झाली होती. जीव मुठीत घेऊन देवळेकर कुटूंबिय या इमारतीत राहात होते.इमारत जीर्ण आणि धोकादायक झाल्याने पतीसोबत राहणाऱ्या देवळेकर यांना आपला संसार तत्काळ गिरगाव येथे भाडय़ाच्या खोलीत हलवावा लागला. आजतागायत ते भाडय़ाने राहत असून म्हाडाने मात्र देवळेकर यांना भाडय़ाचे कोणतेही पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्यांची प्रचंड गैरसोय झाली होती.