पिकांच्या फवारणीचे टेन्शन खल्लास, ड्रोनच्या मदतीने फवारणी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अमरावती

कपाशीवर येणाऱ्या किटकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्याचे कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांना ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्याक्षिक मोर्शी येथे दाखविण्यात आले.

राज्यातील कपाशीचे क्षेत्र ४० लाख हेक्टरपर्यंत आहे.या पिकांवरील बोंडअळीसह विविध प्रकारच्या किड नियंत्रणासाठी किटक नाशके फवारणी करावी लागतात. परंतु तज्ज्ञ मनुष्यबळ अलीकडे उपलब्ध होत नसून मजुरांची प्रचंड वानवा आहे. अशास्त्रीय वापराने शेतकरी, शेतमजुरांचा बळी जात आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने यांत्रिकीकरणावर भर दिला असून विशेषत:हा कपाशी पिकांवरील किटक नाशकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. स्वयंचलित यंत्राद्वारे 15 मिनिटात एक एकरावर फवारणी केली जाणार आहे. बॅटरीवर चालणारे हे ड्रोन असून यामध्ये जीपीएस प्रणाली आहे. एकवेळ क्षेत्र मोजमाप केल्यास पुन्हा मोजण्याची गरज नाही. किटकनाशकांचा प्रार्दूभाव किती हे सुद्धा कळणार आहे. त्यामुळे फवारणी किती करावी, हे देखील निश्चित होणार.

उल्लेखनिय म्हणजे मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केल्यास यापुढे शेतकऱ्यांचा जीव वाचावा हा उद्देश ड्रोनच्या फवारणीमागे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.