
सामना ऑनलाईन। भोपाळ
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार पडल्यानंतर आता मध्य प्रदेशात लवकरच ‘ऑपरेशन कमल’ होणार अशी चर्चा असतानाच भाजपला धक्का बसला. मुख्यमंत्री कमलनाथ सरकारने मांडलेल्या एका विधेयका वेळी मतविभाजन झाले. या वेळी भाजपच्या दोन आमदारांनी विधेयकाच्या बाजूने मत टाकत सरकारला पाठिंबा दिला. आणखी काही भाजप आमदार आमच्याकडे येतील, असा दावा काँग्रेसने केला आहे.
गुन्हेगारी कायदा दुरुस्ती विधेयकावर मतदान झाले. तेव्हा कमलनाथ सरकारच्या बाजूने 121 मते पडली. काँग्रेसचे 120 आमदार आहेत. विधानसभा अध्यक्षांनी मतदान केले नाही. त्यामुळे विधेयकाच्या बाजूने 119 मते मिळायला हवी होती. दोन जादा मते भाजपची मिळाली आहेत. भाजप आमदार नारायण त्रिपाठी आणि शरद कौल यांनी सरकारच्या बाजूने मतदान केले.
ही तर घरवापसी
मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार त्रिपाठी आणि कौल म्हणाले, सात महिने जुन्या कमलनाथ सरकारला आमचा पाठिंबा आहे. कारण आम्हाला मतदारसंघाचा विकास करायचा आहे. ही तर ‘घरवापसी’ आहे, असे हे आमदार म्हणाले. नारायण त्रिपाठी आणि कौल हे दोघेही पूर्वी काँग्रेसमध्ये होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
सरकारकडे पूर्ण बहुमत – कमलनाथ
गेल्या सहा महिन्यांपासून दररोज भाजपकडून मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अल्पमत असल्याचा दावा केला जात आहे. पण आपले सरकार पूर्ण बहुमतात असल्याचे सिद्ध झाले आहे, असे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपच्या दोन आमदारांच्या ‘घरवापसी’चे स्वागत केले आहे. या आमदारांनी भाजपला आरसा दाखवल्याचे शिंदे म्हणाले.
काँग्रेसमधील अंतर्गत कलहातून सरकार पडेल – चौहान
मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी आम्ही कारणीभूत ठरणार नाही. अंतर्गत कलहातून काँग्रेस नेतेच हे सरकार पाडतील. बसपा, सपाचा सरकारला पाठिंबा आहे. काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद सुरू आहे, असे भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसने खेळ सुरू केला आहे तो आता आम्ही संपवू, असा इशारा भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांनी दिला.


























































