
सामना ऑनलाईन। इंदूर
कर्नाटकमधील कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतर आता कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेचा दावा भाजप करणार आहे. या पार्श्वभूमीवर, आता मध्य प्रदेशमधील भाजपचे नेते गोपाळ भार्गव यांनी 1 आणि 2 नंबरने आदेश दिले तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे सरकारही आम्ही 24 तासांत पाडू, अशी धमकी दिली आहे. कर्नाटकनंतर आता मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारची पाळी येणार आहे, असा या धमकीचा अर्थ काढला जात आहे. या आधीही भार्गव यांनी कमलनाथ सरकार सात महिने सत्तेत राहिले असून हा काळ खूप आहे, असे वादग्रस्त विधान केले होते.
आता मध्य प्रदेशची पाळी
कर्नाटकमधील सरकार कोसळल्यानंतर आता मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजप मोर्चेबांधणी करत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. 230 सदस्य संख्या असलेल्या मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे 109 आमदार निवडून आले. बसप आणि अपक्षांचा पाठिंबा घेत काँग्रेसने तिथे सत्ता स्थापन केली. 121 आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा असल्याचा दावा कमलनाथ यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपची बाजी
मध्य प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत 29 पैकी 28 जागा भाजपने जिंकल्या. काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. त्यामुळे कर्नाटकमधील सरकार उलथवल्यानंतर आता कमलनाथ यांच्या सरकारला सुरुंग लावण्याचे प्रयत्न भाजप करणार आहे, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
कर्नाटकसारखा प्रकार आजवर पाहिला नाही!
कर्नाटकात 15 दिवसांपासून सुरू असलेले राजकीय नाटय़ मंगळवारी संपुष्टात आले. काँग्रेस आणि संयुक्त जनता दलाचे सरकार कोसळले. यावर माजी पंतप्रधान आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कर्नाटकमधील काँग्रेस आणि संयुक्त जनता दलाचे सरकार उलथवून टाकण्यासाठी जे राजकीय नाटय़ घडले तसे नाटय़ मी माझ्या आतापर्यंतच्या राजकीय जीवनात पाहिले नाही. भाजपसारख्या एका राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वाने आमदारांना खरेदी करण्याची परवानगी कशी दिली, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही
कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी ट्विटरवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही, याची जाणीव तुम्हाला एक दिवस होईल. प्रत्येकाला धमकावले जाऊ शकत नाही. प्रत्येक खोटे एक दिवस उघडे पडते,’ अशी टीका त्यांनी केली.





























































