
>> नामदेव सदावर्ते
महाराष्ट्रातील सर्व संतांनी मराठी भाषेतच अभंग रचना करून भोळ्या भाविकांशी संवाद साधला. मातृभाषा मराठीतच सर्व समाजाला उपदेश केला. प्रसंगानुसार हिंदी भाषेतसुद्धा जनतेला संतांनी मार्गदर्शन केले. संत नामदेवांनी महाराष्ट्राबाहेर उत्तरेकडे जाताना राम–कृष्ण–हरी या मंत्राचा नामघोष करीत हिंदी भाषेतून जनतेशी संवाद साधला. मराठी भाषेप्रमाणे संस्कृत, हिंदी, तुर्की, ऊर्दू, कानडी, कोकणी, मारवाडी, गुजराथी, अहिराणी आदी भाषांचा वापर संतांनी केला. अभंग रचना व ग्रंथ रचना मराठी भाषेतूनच केली, पण काही प्रमाणात हिंदी भाषेतील अभंगही उपलब्ध आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत छपन्न भाषेतील शब्दांचा वापर केला आहे, असे संत नामदेवांनी म्हटले आहे. अनेक संत साहित्याच्या अभ्यासकांनी ते मान्य केले आहे. संत नामदेव म्हणतात-
अध्यात्मविद्येचे दाविलेसे रूप ।
चैतन्याचा दीप उजळीला ।।
छप्पन्न भाषेचा केलासे गौरव ।
भवार्णवी नाव उभारीली ।।
मराठी भाषेप्रमाणे अन्य भाषिक जनतेला आपलेपणा वाटावा, सर्वांना त्या कल्याणकारी ज्ञानाचा, विद्येचा उपयोग व्हावा, या व्यापक हेतूने ज्ञानराजांनी इतर भाषेतील हजारो शब्द ज्ञानेश्वरीत वापरले आहेत. संस्कृत, तत्सम, तद्भव आदी सर्व प्रकारचे शब्द संत वाङ्मयात आढळतात. संत नामदेवांच्या अनेक अभंगातही विविध भाषेतील वाक्ये आहेत.
एका अभंगात पाच निरनिराळ्या भाषेतील वाक्ये आहेत. यमुनातीरी स्नानासाठी आलेल्या गवळणींची वस्त्र्ाs घेऊन कदंबवृक्षावर बसलेल्या श्रीकृष्णाला त्या आपली वस्त्र्ाs देण्यासाठी विनवणी करतात. या पाच गवळणी आपली विनवणी पाच भाषेत करीत आहेत. ही अभंग-गवळण वारकरी संप्रदायात लोकप्रिय आहे. या अभंगाची सुरुवात अशी आहे.
गवळणी ठकविल्या, गवळणी ठकविल्या ।
एक एक संगतीने, मराठी कानडीया ।
एक मुसलमानी, कोकणी गुजरणी ।
अशा पाची जणी, गवळणी ठकविल्या ।।
मराठी, कानडी, ऊर्दू, कोकणी व गुजराती भाषेतून या पाच गवळणी कृष्णाला आपापल्या भाषेतून विनवणी करतात. सर्व संतांना मराठी या आपल्या मातृभाषेबद्दल आदर आणि अभिमान वाटत होता. योग्यप्रसंगी संत इतर भाषेचाही आदरपूर्वक वापर करीत असत. भक्तराज नामदेवांनी ज्ञानदेवादि संतांच्या समाधी सोहळ्यांनंतर आपले उत्तर आयुष्य महाराष्ट्राबाहेर पंजाब प्रांतात घालविले. पंजाबातील हिंदू व शिख धर्मियांना मानवता धर्माची शिकवण देऊन राम-नामस्मरणाचा सोपा भक्तिमार्ग सांगून सामान्य जनतेस मार्गदर्शन केले.
अशांत मन शांत करण्यासाठी नाम-स्मरण, ध्यान व प्रेमभक्ती हा सहजसोपा उपासनामार्ग त्यांनी शिकविला. सर्व जातीधर्माच्या लोकांशी सुसंवाद साधण्यासाठी संत नामदेव हिंदी, पंजाबी या भाषेचा वापर करीत होते. त्यांनी हिंदुस्थानी हिंदी भाषेत पदरचना केली. शिखधर्मियांचा गुरुग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथात नामदेवांचे एकसष्ट अभंग समाविष्ट करण्यात आले आहेत. आजही हे अभंग पंजाबी शिख बांधवांच्या नित्यपठणात आहेत.
संत नामदेवांनी उत्तर हिंदुस्थानात अनेक पदयात्रा केल्या. त्यांनी कीर्तनाच्याद्वारे साध्या-भोळ्या, आबाल-वृद्धांना ईश्वरी भक्तीच्या प्रेमानंदात रंगविले. उत्तर हिंदुस्थानात गेली शेकडो वर्षे हिंदी साहित्य प्रचलित आहे. सांस्कृतिक परंपरेच्या रक्षणासाठी हिंदीसारस्वत महिमा स्वयंसिद्ध आहे. त्या हिंदी भक्ती साहित्याच्या दरबारात संतसंप्रदायाचे प्रवर्तक म्हणून संत नामदेवांचा मानही मोठा व स्वयंसिद्ध आहे.
संत नामदेवांच्या काळात मुसलमानी निर्गुणोपासक होते. आरंभी सगुणोपासक असलेल्या नामदेवांनी सुबोध हिंदी अभंगांद्वारे निर्गुण भक्तिमार्गाचा प्रचार सुरू केला. त्यांच्या हिंदी काव्याचे स्वरूप अप्रतिम आहे. त्यांच्या मते परमेश्वराचे चरण ज्या योगाने अंतरतील, असे काव्य नको, गाणे नको. एका हिंदी पदात परमेश्वरप्राप्तीसाठी मार्ग सांगताना ते म्हणतात-
न होई ज्यौ कवित परमोद्य रचैता ।
न होई ज्यौ सुघटपणै गाता । जेन्हे होई ज्यौ आतमा ।
काव्यात भगवंताची भेट करून देणाऱया भक्तीचे उत्कट दर्शन झाले पाहिजे. नामदेवांची आत्मगत हिंदी अभंग रचना भावकाव्य आहे. सहज संस्कारी चित्तवृत्तीचा तो आविष्कार आहे. या काव्योध्यानात नामद्राक्षांचे रसयुक्त मधुर घड आहेत. नामदेवाची विठ्ठलभक्तीची उत्कंठा हिंदी काव्यात व्यक्त झाली. भगवंताच्या दर्शनाची त्यांच्या मनाला एकसारखी तळमळ लागलेली होती. त्यांच्या वर्णनात एके ठिकाणी व्यावहारिक दृष्टांताचा उपयोग करून ते म्हणतात-
मोहि लागत तालाबेली । बछरे बिनु गाई अकेली ।।
पानीआ बिनु मीनु तलफै । ऐसे रामनामा बिनु बापुरो नामा।।
गाईशिवाय वासरू, पाण्याविना मासोळी म्हणजे देवाविना भक्त अशा औचित्यपूर्ण शब्दात ते आपली उत्कंठा व्यक्त करतात.
उत्तर हिंदुस्थानात नामदेवांचे विचार त्या काळाच्या परिस्थितीतसुद्धा रूजू शकले. पुढील विचारवंतांना ते प्रेरक ठरले. हिंदी भक्ती साहित्यात नामदेवांच्या विचाराचे उमटलेले पडसाद पाहता कबिरादि संतकवींचे स्फूर्तिस्थान नामदेवच होते. कबीर आपल्या कवितेत संत नामदेवांचे भक्तिसामर्थ्यांचे वर्णन करतात. समाजातील पाखंड व बाह्यावडंबर पाहून नामदेवांचे मन विषण्ण होई. निराकार ईश्वराची पार्थिव पूजा अशक्य असते. दगडांना देव मानणाऱयांच्या कल्पनेचा नामदेवांनी उपहास केला. देवाला बळी देण्याच्या घातक प्रथेचे खंडन करताना ते म्हणतात-
पाहन अंगे देव काटिला । बाको प्राण नही वाकी पूज रचैला।।
निरजीव आगे सरजीव मारै । देखत जाणत आपण हारै ।।
ज्या दगडात प्राण नाही त्याची पूजा करणे, त्याला मूक सजीव प्राण्याचा बळी देणे यामुळे अज्ञानी लोक आपला प्राणही गमावतात.
संत नामदेवांनी हिंदू-मुस्लिम एकतेसाठी मानवी समतेचा पुरस्कार-प्रचार केला. नामदेवांच्या कित्येक हिंदी अभंगात निर्गुण-निराकार परमेश्वराचे महत्त्व सांगितले आहे. सगुण-उपासना व अद्वैतज्ञानाचा ते प्रचार करीत होते. मानवाच्या पूर्ण विकासात अडथळा निर्माण करणारी अस्पृश्यता ही त्या काळात बिकट समस्या होती. माणसा-माणसातील आर्थिक, सामाजिक, धार्मिक विषमता दूर करण्याचे प्रयत्न संत नामदेवांनी केले.



























































