
सामना ऑनलाईन। श्रीनगर
जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम -370 हटवण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी संसदेत जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवण्याचा प्रस्ताव मांडला. मोदी सरकारच्या या धाडसी निर्णयाचे देशभरातून कौतुक होत असतानाच पाकिस्तानची मात्र तंतरली आहे. आपला हा राग पाकिस्तानी नागरिक सोशल मिडीयावर व्यक्त करत आहेत.
अमित शहा यांनी संसदेत 370 कलम हटवण्याची शिफारस केल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. काहीजणांनी पंतप्रधान इमरान खान यांनाच लक्ष्य केलं. तर काहीजण कश्मीर आमचाच आहे असे नारेबाजी करत आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये काहीतरी घडणार याची खात्री झाल्याने पाकिस्तानी मिडीयामध्येही कलम 370 च्या बातम्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने विरोधकांच्या प्रचंड गोंधळात हिंदुस्थानने कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवल्याचा प्रस्ताव मांडल्याचे म्हटले. तर ‘द न्यूज’ या वृत्तपत्रातील एका लेखात पाकिस्तान हिंदुस्थानविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा विचार करत असल्याचे म्हटले. कश्मीर मुद्दयाप्रकरणी पाकिस्तान नेहमी सक्रिय राहीले आहे. पण आता शांत राहून चालणार नाही. असे नमूद केले आहे. तर एका यूजर्सने सर्व इस्लामिक देशांनी एकत्र येण्याची ही वेळ असल्याचे म्हटले असून पंतप्रधान इमरान खान यांना आताच योग्य पाऊल उचलण्याची वेळ असल्याचे म्हटले आहे.
























































