मुरुगवाड्यात वाळूउत्खनन करणार्‍यावर कठोर कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

मुरुगवाडा परिसरात होणारे वाळूचे उत्खनन हेच मिर्‍या किनारपट्‌टीवर समुद्राचे पाणी शिरण्याचे एक कारण आहे. मुरुगवाडा परिसरात वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही पावले उचलत आहोत. मिर्‍या परिसरात वाळू उत्खनन होणारच नाही याकडे काटेकोर लक्ष दिले जाईल असे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वाळूमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.

मिर्‍या धूपप्रतिबंधक बंधारा वाहून गेल्यामुळे किनारपट्‌टीवर लाटांचे तांडव सुरु आहे. धूपप्रतिबंधक बंधार्‍यापाठोपाठ लाटांनी रस्ता गिळला आणि एका घराची संरक्षक भिंतही वाहून नेली. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सांगितले की, मी स्वतः तेथे जाऊन पाहणी केली. तेथील वयस्कर मंडळींनी सांगितलेली वाळू उत्खननाबाबत गोष्ट गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण म्हणाले की, मुरुगवाडा परिसरात वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मिर्‍या येथील ग्रामस्थांचे प्राण वाचणे महत्वाचे असल्यामुळे मी मुरुगवाड्यातील वाळूउत्खननावर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रांत आणि तहसीलदारांना दिल्या आहेत.

लोकशाही दिनाला दोन अधिकाऱ्यांची दांडी
लोकशाही दिनाला दोन अधिकाऱ्यांनी दांडी मारली. त्यामध्ये वनविभागाच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश होता. आज जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर लोकशाही दिनात आलेल्या तक्रारीबाबत त्यांनी माहिती दिली.