
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानची तंतरली असून पुढची रणनीती ठरवण्यात ते अपयशी ठरत असल्याने पाकिस्तानकडून दर्पोक्ती आणि पोकळ धमक्यांचे फुत्कार टाकण्यात येत आहेत. पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी युद्धाची दर्पोक्ती केल्यानंतर कश्मीरींच्या अधिकारासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो, असे फुत्कार पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी सोडले आहेत. कश्मीरमधील घडामोडीनंतर राष्ट्रपती अरीफ अल्वी यांनी मंगळवारी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. तर बाजवा यांनी कॉर्प्स कमांडरची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर बाजवा बरळले आहेत.
कश्मीर मुद्द्यावर हिंदुस्थानने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, या मागणीला पाकिस्तानी लष्कराचा पाठिंबा असून कश्मीरींच्या अधिकाराच्या लढाईत आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे ट्विट या बैठकीनंतर पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केले आहे. बाजवा यांचा हवाला देत कश्मीरींच्या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असून याबाबत आम्ही आमची भूमिका योग्य तऱ्हेने पार पाडू. कश्मीरींच्या अधिकारासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो असेही ते म्हणाले आहेत. याआधी मंत्री फवाद चौधरी यांनीही युद्धाची दर्पोक्ती केली होती. कश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान जगभरातून सहानभुती आणि पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यात त्यांना अपयश आले आहे. चीनने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर अमेरिकेने दोन्ही देशांनी संयम पाळत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी मलेशिया आणि तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची चर्चा करून हा मुद्दा उपस्थित केला आहे. कश्मीर मुद्द्याबाबत इस्लामिक सहयोग संघटनेने मंगळवारी बैठक बोलावली आहे. त्यात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत.
कश्मीर हा आतंरराष्ट्रीय मुद्दा असल्याने हिंदुस्थान याबाबत एकतर्फी निर्णय घेऊ शकत नाही. हा निर्णय पाकिस्तान आणि जम्मू कश्मीरच्या नागरिकांना मान्य नाही. हिंदुस्थानी सरकारने धोकादायक निर्णय घेतला असून कश्मीर खोऱ्यातील शांतता धोक्यात आली आहे, असे कुरेशी बरळले आहेत. मोदी सरकारच्या या निर्णयाने पाकिस्तान भांबावल्याचे या प्रतिक्रियांमधून दिसून येत आहे.




















































