
सामना प्रतिनिधी । पणजी
सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या जोडीला तिलारी धरणातील पाणी कोणतीही कल्पना न देता सोडल्याचा फटका उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील इब्रामपुर गावाला बसला. तिलारी धरणाचे पाणी सोडले जाणार असल्याची कल्पना या गावातील लोकांना मिळाली नव्हती. काल रात्री तिलारीचे पाणी शापोरा नदीत चढू लगताच देवेंद्र मडकर यांचे मातीचे घर कमकुवत बनले. काल रात्री या घरातील जवळपास 25 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. आज दुपारी 12 च्या सुमारास हे घर पत्त्याच्या बंगल्या सारखे कोसळल्याने ऐन पावसात मडकर कुटुंबिय बेघर झाले आहे.
मडकर यांच्या प्रमाणे सुनील कुबल,अशोक कुबल आणि मधुकर कुबल यांची घरे देखील पाण्याने वेढल्याने कमकुवत बनली असून कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण खाली आहे.या घरातील लोकांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.त्याशिवाय आरोबा ,कासारवर्णे आणि इब्रामपुर मधील मिळून तब्बल 167 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.



























































