दादरच्या सिद्धपुरा परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाचे काम लवकरच सुरू करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-high-court

सामना ऑनलाईन । मुंबई

दादरच्या सिद्धपुरा परिसरातील आठ इमारतींच्या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रिचा डेव्हलपर्सने हायकोर्टात दिले आहे. मेट्रोचे ना हरकत प्रमाणपत्र मिळून एक वर्ष उलटले, परंतु इमारतींच्या कामासाठी अवजड वाहनांची वाहतूक करण्यासाठीचा रस्ताच मेट्रोच्या कामामुळे ब्लॉक झाला असल्यामुळे काम रखडल्याचे विकासकाने सांगितले. तसेच याप्रकरणी तोडगा काढण्यात आला असून लवकरच इमारतींचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

रिचा डेव्हलपर्सने सिद्धपुरा परिसरात राहणाऱ्या 172 कुटुंबीयांची जागा घेऊन त्याबदल्यात रहिवाशांना भाडे देण्यासंदर्भात 2012 साली करार करण्यात आला होता, परंतु ताब्यात घेतलेल्या आठ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. याप्रकरणी अभिनव दादर टेनंट असोसिएशन आणि इतर रहिवाशांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अकील कुरेशी आणि न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी रिचा डेव्हलपर्सने गेल्या सात वर्षांपासून पुनर्विकासाचे काम का रखडले याबाबतचे स्पष्टीकरण दिले.

…म्हणून रखडला पुनर्विकास

पर्यावरण, हेरिटेज, मेट्रो, इमारतींच्या उंचीबाबत नागरी उड्डाण संचालनालयाची परवानगी अशा विविध परवानग्या मिळविण्यासाठी सात वर्षे लागली. मेट्रोने 12 जून 2018 मध्ये ना हरकत प्रमाणपत्र दिले, परंतु ज्या ठिकाणी संबंधित इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे त्या ठिकाणी जवळच मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे सिमेंट, रेती वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांना जाण्या-येण्यासाठी जागाच नाही. याप्रकरणी तोडगा काढण्यात आला असून लवकरच इमारतींचे बांधकाम सुरू करण्यात येईल, असे रिचा डेव्हलपर्सच्या बिझनेस डेव्हलपमेंट विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश कांबळी यांनी हायकोर्टात सांगितले.