
सामना ऑनलाईन,नवी दिल्ली
जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या आव्हान याचिकेवर तत्काळ सुनावणीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. यावेळी याचिकाकर्त्यालाही न्यायालयाने चांगलेच झापले.
पाकिस्तान सरकार आणि काही कश्मिरी लोक हे संयुक्त राष्ट्रसंघात हिंदुस्थान सरकारच्या या निर्णयाविरोधात जाणार आहेत. त्यामुळे त्या आधीच 12 किंवा 13 ऑगस्टला यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी केली जावी. केंद्र सरकारचा निर्णय बेकायदेशीर आहे, असे याचिकाकर्त्याचे वकील एम. एल. शर्मा यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने याचिकाकर्त्याचेच कान उपटले. पाकिस्तान सरकार किंवा कश्मिरी लोक हे संयुक्त राष्ट्रसंघात गेले तर संयुक्त राष्ट्रसंघ या निर्णयाला स्थगिती देणार आहे का, तत्काळ सुनावणीची तुम्हाला इतकी घाई का, असे प्रश्न करत तुम्ही तुमची शक्ती या खटल्याच्या सुनावणीसाठी राखून ठेवा, असा सज्जड दम याचिकाकर्त्याला दिला. या प्रकरणाची सुनावणी तत्काळ होणार नाही असे सांगत ज्यावेळी कोर्टासमोर हे प्रकरण येईल त्याचवेळी यावर सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
करण सिंह यांचाही सरकारच्या निर्णयाला पाठिंबा
ज्योतिरादित्य शिंदे, जनार्दन द्विवेदी आणि दीपेंद्र हुड्डा यांच्यापाठोपाठ ज्येष्ठ काँग्रेस नेते करण सिंह यांनीही कलम 370 च्या हद्दपारीला पाठिंबा दिला आहे. सिंह हे कश्मीरातील दिवंगत महाराजा हरी सिंह यांचे पुत्र आहेत. जम्मू-कश्मीरचे दोन भाग करून त्याचे जम्मू-कश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश करणे, त्यांची सीमारेषा निश्चित करणे आणि कलम 35 अ रद्द करणे या गोष्टी स्वागतार्ह असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या स्थानिक पक्षांना देशविरोधी पक्ष म्हणू नये आणि ज्या नेत्यांना अटक केली आहे त्यांची सुटका करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गुलाम नबी आझाद यांना श्रीनगर विमानतळावर रोखले
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना गुरुवारी सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगर विमानतळावर रोखण्यात आले. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आझाद भेटणार होते. त्यामुळेच त्यांना विमानतळावर थांबवण्यात आले. दरम्यान, जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी कश्मिरी लोकांबरोबर संवाद साधत असलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याविरोधात आझाद यांनी वादग्रस्त विधान केले. डोवाल हे पैसे देऊन कश्मिरींना भेटले असा आरोप त्यांनी केला. या आरोपावरून भाजपने त्यांना लक्ष्य केले आहे. आझाद यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. दरम्यान, विमानतळावर रोखल्यामुळे गुलामनबी आझाद यांनी तडकाफडकी आपले निवासस्थान गाठले.






















































