लेख : हिंदुस्थानला ‘अमली’ दहशतवादाचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन,  [email protected]

बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानने हिंदुस्थानविरुद्धची युद्धनीती बदललेली आहे. जागतिक दबावामुळे पाकिस्तान दहशतवादी हल्ले करायच्या ऐवजी हिंदुस्थानमध्ये अफू, गांजा आणि चरसचा दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आपल्या देशानेसुद्धा या बदललेल्या युद्धनीतीला तोंड देण्याकरिता तयार राहिले पाहिजे. आता पुन्हा सोने आणि मानवी तस्करीचे प्रमाण वाढले आहे. यातून देशाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. बेकायदेशीर व्यापार समुद्रमार्गेसुद्धा केला जातो. हा बेकायदेशीर व्यापार थांबवण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतील.

मुंबईसारख्या मोठय़ा शहरात अफू, गांजा, चरस एक व्यसन म्हणून वापरले जाते. मात्र मागील पंधरवडय़ात रत्नागिरीमध्ये  50 लाख किमतीचे कोकेन पोलिसांनी जप्त केले. अटक केलेल्यांमध्ये दोन तटरक्षक दलाचे कर्मचारी होते. तटरक्षक दल सागरी सुरक्षेकरिता जबाबदार आहे. म्हणजे कुंपणच शेत खात आहे. अफू, गांजा, चरस सागरी मार्गाने आणले जाते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. म्हणजे प्रश्न सागरी सुरक्षेचासुद्धा आहे. अलीकडच्या काळात कोकणामध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे.

2019 मध्ये देशात मोठय़ा प्रमाणात तस्करी केलेले अफू, गांजा, चरस पकडण्यात आले आहे. पनवेल परिसरातली एका वेअरहाऊसमधून 130 किलोंचे आणि 1320 कोटी रुपयांचे हेरॉईन 26 जुलैला जप्त करण्यात आले आहे. इराणमधील अब्बास बंदराहून समुद्रमार्गे हा साठा उरण येथील जेएनपीटी येथे पाठवण्यात आला होता. समुद्र मार्गाने अफगाणिस्तानहून हेरॉईनचा साठा हिंदुस्थानात पाठवण्यात येत असल्याची माहिती होती.

पनवेल येथील एका वेअरहाऊसमध्ये हे हेरॉईन 260 गोण्यांमध्ये भरलेले होते आणि या सर्व गोण्या एका कंटेनरमध्ये लपवलेल्या होत्या. या वेअरहाऊसमधून दोन इसमांना अटकही करण्यात आली आहे. यातील एक आरोपी दिल्लीचा रहिवासी आहे, तर दुसरा आरोपी हा कंधार, अफगाणिस्तानचा रहिवासी आहे. हेरॉईनचा हा मोठा साठा अफगाणिस्तानच्या हेरत येथील किला इस्लाम येथून आला. या प्रकारामागे एक आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत आहे.

आतापर्यंत रस्ते मार्गाने हेरॉईनची तस्करी होत होती, पण आता तस्करांनी समुद्र मार्गाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. पंजाबमध्ये 532 किलोंच ड्रग्जचा साठा जप्त केल्यानंतर आता सर्वात मोठय़ा ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांच्या मते हे रॅकेट आयएसआय-तालिबानद्वारे चालवण्यात येत आहे.

गुजरातजवळच्या समुद्रात तटरक्षक दलाने  600 कोटी रुपयांचे अमली पदार्थ हिंदुस्थानात तस्करीसाठी आणणारी पाकिस्तानी बोट 21 मे 2019 रोजी पकडली. बोटीसह सहा पाकिस्तानी खलाशांना ताब्यात घेण्यात आले.

हिंदुस्थानी तटरक्षक दल आणि गुजरातच्या एटीएसने मोठी कारवाई करत 27 मार्च 2019 रोजी हिंदुस्थानी हद्दीत घुसणाऱया 9 अमली पदार्थांच्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे तस्कर सुमारे 100 किलो हेरॉईन घेऊन हिंदुस्थानात येत होते. हे हेरॉईन 500 कोटी रुपये इतक्या किंमतीचे आहेत. हिंदुस्थानी तटरक्षक दलाने गुजरातच्या किनाऱयापासून दूर उभ्या असलेल्या एका व्यापारी जहाजातून 29 जुलै 2017 रोजी 1500 किलो इतके हेरॉईन पकडले होते. त्याची किंमत 3500 कोटी रुपये होती. असे मानले जाते की, पकडलेल्या अफू, गांजा, चरसपेक्षा पुष्कळ जास्त अमली पदार्थ हिंदुस्थानमध्ये घुसवण्यास आपल्या शत्रूंना यश मिळाले आहे. बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानने हिंदुस्थानविरुद्धची युद्धनीती बदललेली आहे. जागतिक दबावामुळे पाकिस्तान दहशतवादी हल्ले करायच्या ऐवजी हिंदुस्थानमध्ये अफू, गांजा आणि चरसचा दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आपल्या देशानेसुद्धा या बदललेल्या युद्धनीतीला तोंड देण्याकरिता तयार राहिले पाहिजे. आता पुन्हा सोने आणि मानवी तस्करीचे प्रमाण वाढले आहे. यातून देशाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. बेकायदेशीर व्यापार समुद्र मार्गेसुद्धा केला जातो. हा बेकायदेशीर व्यापार थांबवण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागतील. सीमा शुल्क, महसूल या खात्यांना अधिक अचूकतेने काम करावे लागेल. त्याशिवाय तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांचे सामान, कंटेनर यांची तपासणी म्हणजेच स्कॅनिंग करावे लागेल. बेकायदेशीर व्यापार थांबवण्यासाठी व्यापारीवर्गाशी संवाद साधून त्यांच्यातील देशहिताची भावना जागृत करावी लागेल. देशभक्ती काही हिंदुस्थानींच्या रक्तात नाही. अनेक हिंदुस्थानी स्मगलिंग व बेकायदेशीर व्यापार करतात. शिवाय आम जनतेचीसुद्धा जबाबदारी महत्त्वाची आहे. अशा व्यापाऱयातून येणारे सोने किंवा इतर वस्तू खरेदी करू नयेत.

1960-70 च्या दशकात हिंदुस्थानी किनारपट्टीवरून होणाऱया तस्करीचे प्रमाण इतके अधिक होते की, त्यामुळे हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला होता. हिंदुस्थानी नौदलाला ही तस्करी थांबवण्यात अपयश आले. त्यानंतर ‘ताशा’ आणि ‘स्वान’ या दोन मोहिमा आखल्या. श्रीलंकेतून खास करून एलटीटीईच्या दहशतवाद्यांकडून येणारी शस्त्रs, दारूगोळा थांबवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात नव्या मोहिमा राबवण्यात आल्या, पण त्यांना सपशेल अपयश आले. त्यानंतर तटरक्षक दलाची स्थापना करण्यात आली. आज हिंदुस्थानी तटरक्षक दलाची संख्या लक्षणीय आहे. मात्र अजूनही ही तस्करी थांबलेली नाही.

आपण जास्त लक्ष समुद्रकिनाऱयावरून होऊ शकणाऱया दहशतवादी हल्ल्यावर केंद्रित करत आहोत. वास्तविक 2008 नंतर कोणतेही दहशतवादी समुद्राकडून आलेले नाहीत. मात्र तस्करी, अमली पदार्थांचा व्यापार आणि इतर गैरकृत्ये समुद्रकिनाऱयावर नियमितपणे होत आहेत. त्यामुळे आपले लक्ष या किनाऱयावर असले पाहिजे. याशिवाय पश्चिम किनारपट्टीवरून माणसांचा व्यापार केला जातो. रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर येऊन वस्ती करतात. त्यांनाही थांबवणे गरजेचे आहे. येत्या काळात हा आकडा वाढणार आहे. या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी सुरक्षा दलांना डोळ्यांत तेल घालून काम करावे लागेल. तसेच सामान्य नागरिकांनी परदेशी बनावटीच्या तस्करी होणाऱया सर्व वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे खासकरून चिनी वस्तूंवर.

पंजाबमधील अर्धी पिढी ही अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे बोलले जाते. शिवाय महानगरांमध्येही तरुण पिढीला अमली पदार्थांचे आकर्षण मोठय़ा प्रमाणात आहे. सगळ्या हिंदुस्थानी जनतेने एकत्र येऊन या तीनही गोष्टींच्या विरोधात युद्ध पुकारणे आवश्यक आहे.

अमली पदार्थांची तस्करी, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगताने घडवून आणलेली अवनती, दहशतवादी संघटना व त्यांचे सहाय्यकर्ते याबाबतचे गुप्तवार्तांकन निकृष्ट आहे. कृतीयोग्य गुप्त वार्तांकन ही काळाची गरज आहे. कारण साधनसामग्री नेहमीच अपुरी असणार आहे. शेजारी देशांतून गुप्तवार्ता मिळविण्याबाबत आंतरराष्ट्रीय सहकार विकसित करण्यात देशाने पुढाकार घेतला पाहिजे. सोने, अमली पदार्थ, डिझेलची तस्करी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. नौदल, तटरक्षक दल, पोलीस आणि सीमा शुल्क विभागांच्या सहाय्याने त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे.

तस्करांची आणि गुन्हेगारी टोळ्यांची अभद्र युती आणि तिची वाहतूक यंत्रणा कार्यपद्धती ओळखण्याची गरज आहे. किनारी भाग व अंतर्भागातील तस्कर, हवालाचालक आणि गुन्हेगारी टोळ्या ओळखल्या पाहिजे. सुरक्षा दलांचे परस्पर समन्वय वाढवून पेट्रोलिंगचा दर्जा वाढवून आपण स्मगलिंग, बेकायदा व्यापार थांबवण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो. नव्या प्रकारच्या दहशतवादाला तोंड देण्याकरिता आपली सुरक्षा दले, गुप्तहेर खाते आणि सामान्य नागरिक यांनीही सज्ज व्हायला पाहिजे, अन्यथा आपण तस्करांच्या एक पाऊल मागेच राहू.