पेण : गागोदेजवळ एसटीला टँकरची धडक; 2 ठार 36 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पेण

खोपोलीकडून पेणकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला गागोदे जवळ समोरून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 2 ठार तर 36 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खोपोली येथून पेणकडे जाणारी सकाळची पावणे नऊची बस (क्रमांक एम एच 20 बी एल 0547) ही प्रवाशी घेऊन जात असताना ती गागोदे जवळील वळणावर आली असता समोरून भरधाव वेगात आलेल्या टँकरने जोरात धडक दिली. टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने धडक दिल्यावर टँकर रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात एसटीतील प्रवासी जेष्ठ शिवसैनिक व बोरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ बाळाराम म्हात्रे (50, बोरी) आणि दिनेश खेडेकर (26,नानेगाव) याचा मृत्यू झाला आहे. तर जखमी प्रवाशांना पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी 7 गंभीर जखमींना अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पेण येथील खाजगी रुग्णालयात 10 जखमी रूग्णांवर उपचार सुरू आहेत.