सीमेवर ‘ईद मुबारक’ नाहीच, पाकिस्तानने हिंदुस्थानची मिठाई नाकारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
beating the retreat at wagah attari border

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

हिंदुस्थान-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर आज ईदनिमित्त हिंदुस्थानच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दिलेली मिठाई पाकिस्तानी रेंजर्सने घेण्यास नाफ नकार दिला. राजस्थानसह अनेक ठिकाणी सीमेवर हिंदुस्थानी लष्कराच्या अधिकार्‍यांनी पाकिस्तानी सैन्याच्या अधिकार्‍यांना मिठाई देण्याचा प्रयत्न केला. पण पाकिस्तानी अधिकार्‍यांनी मिठाई नाकारली. दरवर्षी ईदनिमित्त हिंदुस्थानी सैनिक सीमेवर पाकिस्तानी अधिकार्‍यांना मिठाई भरवतात. जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवल्यामुळे पाकिस्तानी लष्कराचाही जळफळाट असा उघडपणे दिसू लागला आहे. दरम्यान, बांगलादेश आणि हिंदुस्थानमध्ये सीमेवर ईदनिमित्त मिठाईची देवाणघेवाण  झाली.  

अजित डोवालांनी केली हवाई पाहणी

श्रीनगर- जम्मू कश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर सोमवारी ईद साजरी होत असताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी कश्मीर खोर्‍याची हवाई पाहणी केली. कश्मीरचा शहरी भाग आणि दक्षिण कश्मीरच्या भागांत डोवाल फिरले. याशिवाय पोलीस प्रमुख दिलबाग सिंह आणि लष्करी अधिकार्‍यांनीही कश्मीर खोर्‍याच्या विविध भागांची हवाई पाहणी केली. तसेच डोवाल लाल चौक, पुलवामा आणि बेलगामसारख्या भागांत जाऊन स्थानिकांचीही भेट घेतली.

कश्मिरी स्वतःच्याच घरात बंदिस्त – येचुरी

जम्मू-कश्मीरचे कलम 370 हटवून तेथील कश्मिरींना त्यांच्या घरातच कैद करून ठेवले आहे, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला आहे. विशेष दर्जा हटवल्याचे पडसाद ज्या राज्यांना विशेष दर्जा देण्यात आलेल्या इतर राज्यांतही उमटतील, असे येचुरी म्हणाले. जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर सीताराम येचुरी, डी. राजा यांना कश्मीरमध्ये प्रवेश करताना मनाई करण्यात आली होती. ‘कश्मीरमधील  कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सध्या कुठे आहेत, हे आम्हाला माहीत नाही. त्यांना भेटण्याची परवानगी सरकारने नाकारली आहे,’ असे ट्विटही त्यांना केले.

गोळीबाराची एकही घटना घडलेली नाही

याबाबतची माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत गृहसचिवांनी कश्मीरमध्ये गोळीबार झाल्याचा तसेच या गोळीबारात काही लोक मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. गोळीबार तसेच या गोळीबारात मृत्युमुखी पडल्याचे प्रसिद्धीमाध्यमात आलेले वृत्त तद्दन खोटे असून तशी एकही घटना घडलेली नाही, असेही गृहसचिव कंसल यांनी स्पष्टपणे सांगितले.

अपप्रचार करणार्‍या 8 वेबसाइटस् ब्लॉक

कश्मीरमधील सद्यस्थितीबाबत अफवा पसरविणारे वृत्त व्हायरल करणार्‍या 8 वेबसाइटस् ब्लॉक करण्याचे आदेश केंद्र सरकारने आज ट्विटरला दिले. @kashmir787 (व्हॉइस ऑफ कश्मीर), Red4kashmir (मदिहा शकील खान), @arsched (Arshad Sharif, @mscullyan (Mary secutly), @sageelaniii (Syed Ali Geelani), @sadaf2k197, @@Riazkhan 61370907, @riazkha723  या वेबसाइटस् असून या ट्विटर हॅण्डलवरून गेल्या काही दिवसांपासून कश्मीरबाबत खोडसाळपणे वृत्त प्रसिद्ध करणे सुरू होते. त्यामुळे केंद्रीय गृहसचिव रोहित कंसल यांनी एक आदेश जारी करून या 8 वेबसाइटस् ब्लॉक करण्यास ट्विटरला सांगितले. यातील अर्शद शरीफ हा ‘एआरवाय न्यूज’चा तर ‘मेरी स्वल’ हा पाकिस्तान टुडेचा पत्रकार आहे. सोशल मीडिया तसेच आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये कश्मीरच्या परिस्थितीची नकारात्मक बाजू दाखवून कश्मीरची छबी खराब करण्याचा सपाटा या वेबसाइटस्नी लावला होता. एवढेच नव्हे तर, कश्मीरला बदनाम करणारा मॅसेज व्हायरल करण्याची मोहीमही गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यामुळे या वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश देणे भाग पडल्याचे गृहसचिवांनी सांगितले.

जम्मू-कश्मीरमधील घडामोडींवर आमचे बारीक लक्ष-चीन

जम्मू-कश्मीरमधील घडामोडींवर आमची बारीक नजर असल्याचे चीनने म्हटले आहे.   r हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात द्वीपक्षीय मुद्दय़ांवर आज सोमवारी चर्चा झाली. त्यावेळी वांग यी यांनी जम्मू-कश्मीरप्रकरणी आपली भूमिका मांडली. हिंदुस्थान आणि चीनमध्ये विविध मुद्दय़ांवरून मतभेद असू शकतात. परंतु, त्यांचे वादामध्ये रूपांतर होऊ नयेत. अशी भूमिका हिंदुस्थानने व्यक्त केली.

हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे चीनच्या दौ-यावर असून त्यांनी चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासह उपराष्ट्रपती वांग किशान यांची भेट घेतली. यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा झाली. हिंदुस्थान आणि चीनमध्ये शांती आणि स्थिरता कायम राहण्याची अपेक्षा यावेळी दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये सध्या जे व्यापारी स्तरावर असंतुलन आहे ते दूर होईल असा विश्वास चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी व्यक्त केला.