
सामना प्रतिनिधी। चिरनेर
चिरनेर गावात पूरस्थिती निर्माण होऊन तब्बल बारा दिवस उलटूनही या गावातील पूरग्रस्तांच्या नुकसानीचे साधे पंचनामेही चिरनेर तलाठी कार्यालयाने न केल्याने पूरग्रस्त मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
चिरनेरमध्ये ९ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. चिरनेरच्या मध्यवर्ती नाल्याला प्रचंड पूर येऊन या नाल्याजवळील घरांमध्ये पाणी शिरून जनतेचे अतोनात नुकसान झाले आहे. यावेळी उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्त जनतेचे वास्तववादी पंचनामे करण्याचे आदेश चिरनेरच्या तलाठ्यांना दिले होते. मात्र चिरनेरच्या तलाठ्यांना तहसीलदारांच्या आदेशाला कवडीचीही किंमत न देता पुरग्रस्तांचे पंचनामे करण्याचे सौजन्यही दाखविले नाही. आपल्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या पूरग्रस्त नागरिकांनी याबाबत तलाठ्यांकडे विचारणा केली असता आम्ही पंचनामे केले असल्याचे मोठ्या तोऱ्यात सांगून या पंचनाम्यांनी आमचा आठ दिवस घाम काढल्याची उपहासात्मक पुस्तीही त्याने जोडली.
वस्तुतः चिरनेरचे तलाठी व महसूल खात्याचा एकही कर्मचारी चिरनेरच्या पुरग्रस्तांच्या पंचनाम्यासाठी फिरकला नसताना तलाठ्यांने पंचनामे कोणत्या निकषाने केले हा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत चौकशी केली असता चिरनेरच्या तलाठ्याने कोतवाल व तलाठी कार्यालयात असणाऱ्या एजंटांना हाताशी धरून तलाठी कार्यालयात पंचनाम्याच्या कागद रंगविले आहेत. त्याचबरोबर नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्याने मनमानिपणे ग्रामपंचायतचा असेसमेंट उतारा किंवा घरपट्टी सादर करणाऱ्यास नुकसान भरपाईची नवी योजना सुरू करून खऱ्या पुराग्रस्थांची घोर चेष्टा चालविली आहे. पर्यायाने पूरग्रस्त बाजूला राहून ज्यांच्या घरात पुराच्या पाण्याचा एक थेंबही न गेलेल्यांनी नुकसानभरपाईचे दावे केले आहेत.
चिरनेच्या तलाठ्याचा सध्या ‘हम करे सो कायदा’ कारभार सुरू असून या कार्यालयात जमीन विक्री एजंटांचा जास्त वावर आहे.तलाठ्याचा या बेफिकीर वृत्तीमुळे जनतेचा सरकारी व्यवस्थेवरील विश्वास उडाला असून तलाठ्याचा या सुलतानी कारभाराला उरणच्या तहसीलदारांचे पाठबळ तर नाही ना असा संशय जनतेतून व्यक्त होत आहे.





























































