
शाळांमधील सक्तीच्या मराठीसाठी राज्य सरकारने तज्ञांची समिती नियुक्ती केली असली तरी या समितीतील ‘तज्ञां’वरूनच आता वाद होऊ लागला आहे. अर्थात हा वाद मराठीच्या भल्यासाठीच आहे, असा दावाही आता काहीजण करू लागले आहेत. एकीकडे हे वादनाट्य रंगत असताना दुसरीकडे पुण्याच्या ‘मसाप’ने परस्पर अभिप्राय आणि सूचना मागवल्याने मराठीच्या भल्याचे श्रेय हायजॅक तर झाले नाही ना, अशी शंकाही उपस्थित झाली आहे.
‘मराठीच्या भल्यासाठी’ या झेंड्याखाली राज्यभरातील 24 संस्थांसह साहित्यिक एकत्र आले आणि 24 जून 2019 रोजी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठीची सक्ती व्हायलाच हवी हा या धरणे आंदोलनाचा हेतू होता आणि तो निश्चितच योग्य होता. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली आणि 19 जुलै रोजी शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे अकादमीत बैठकही झाली. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी शासन आदेश पारीत झाला आणि या विषयावर चर्चा करून अहवाल तयार करण्यासाठी 15 जणांची तज्ञ समितीही नियुक्त करण्यात आली. एवढेच नव्हे तर या समिती सदस्यांना प्रवास व दैनिक भत्ता तसेच बैठक भत्ता देण्याचेही आदेश निघाले. ही समिती राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची करण्याच्या दृष्टीने अन्य राज्यांतील भाषाविषयक अभ्यासक्रमाचा तुलनात्मक अभ्यास करून आपला अहवाल व शिफारशी सरकारला सादर करणार आहे.
‘मसाप’चे आवाहन
मंत्रालयात समितीची जुळवाजुळव सुरू असतानाच पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने सरकारी कायद्याचे प्रारूपच संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आणि 15 ऑगस्टपर्यंत त्यावर सूचना आणि अभिप्रायही मागवले. संकेतस्थळावर आणि पत्राद्वारे काही सूचना–अभिप्राय ‘मसाप’ला मिळाले आहेत, असे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले. मात्र ‘मसाप’ने आंदोलनच हायजॅक केले की काय, असा प्रश्न आता आंदोलनातील सहभागी संस्था प्रतिनिधीच करू लागले आहेत.
एकही बैठक नाही
समितीची अद्यापपर्यंत एकही बैठक झालेली नाही. शिवाय ‘मसाप’ वगळता वा समितीस्तरावर नागरिकांकडून अभिप्राय–सूचना मागवण्याचे कोणतेही जाहीर आवाहन झालेले नाही. पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र समितीच्या बैठका आणि तयार झालेला अभिप्राय यावर निवडणुकीनंतरच निर्णय होईल हे नक्की झाले आहे.
‘तज्ञ’ कोणाला म्हणावे?
सरकारने नियुक्त केलेल्या 15 जणांच्या तज्ञ समितीवरूनही आता नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. या 15 जणांमध्ये बहुतांशी साहित्यिक आहेत, साहित्य क्षेत्रातील मान्यवर आहेत. मात्र तरीही ‘मराठी भाषा’ या विषयात गेली कित्येक वर्षे काम करणार्यांची वर्णी येथे न लागल्याने कुजबूज वाढू लागली आहे. डॉ. श्रीपाद जोशी, प्रा. दीपक पवार, प्रमोद मसुरकर, चंद्रशेखर गोखले ही नावे समितीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दीपक पवार हे ‘मराठी’ शाळा या विषयावर अनेक वर्षे काम करीत असल्याकडे बृहत् आराखडा कृती समितीचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी लक्ष वेधले आहे. शिवाय चंद्रशेखर गोखले यांनी या आंदोलनाचे समन्वयक म्हणून सुरुवातीपासून काम पाहिले आहे तरीही त्यांची वर्णी लागलेली नाही. एकीकडे याबद्दल नाराजी व्यक्त होत असतानाच दुसरीकडे रमेश कीर आणि डॉ. दादा गोरे यांची ‘तज्ञ’ समितीत वर्णी लागल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त होत आहे.
























































