श्रीवर्धन तालुक्यातील कोंडविळी समुद्र किनारी मगरीचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। अलिबाग

महाड सावित्री नदीत मोठ्या प्रमाणात मगरी असून पूरस्थिती वेळी या मगरी नागरी वस्तीत दाखल झाल्या होत्या. पण आता श्रीवर्धन समुद्रकिनारीही आठ फुट लांबीची मगर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र काही वेळाने ही मगर समुद्रामध्ये निघून गेल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे

श्रीवर्धन तालुक्यातील कोंडविळे गावच्या समुद्रकिनाऱ्यावर बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास मासेमारी करणारे व ग्रामस्थ उभे होते. त्याचवेळी अचानक एक जिवंत मगर लाटा समवेत किनाऱ्यावर आली . समुद्राच्या वाळूवर मगर विहार करीत असल्याचे पाहून नागरिकांची भीतीने गाळण उडाली. ग्रामस्थांनी तिला पकडण्याचाही प्रयत्न केला. मात्र मगर चपळाईने पुन्हा समुद्रात निघून गेली.

कोंडविळे समुद्रावर आलेली ही मगर साधारण सात ते आठ फुटाची असल्याचा अंदाज बांधला जात आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल राऊत, वनपाल एच. एल. नाईक, वन रक्षक दिपक शिंदे, दिनेश जिराने, बुराना शेख हे कोंडविळ येथे घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी या मगरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत मगर समुद्रात निघून गेली होती. मात्र समुद्रात मगर कुठून आली व कशी आली याबाबत चर्चेला उधाण आले होते.