
एमएमआरडीएच्या होऊ घातलेल्या शिवडी-न्हावा सागरी सेतू बाधित मच्छीमारांच्या नुकसान भरपाई मिळावी आणि इतर विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी न्हावा ग्रामस्थांच्यावतीने मंगळवारी न्हावा ग्राम सुधार मंडळ व न्हावे खाडी ग्रामस्थ यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पावरच भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संतप्त झालेल्या मोर्चेकरांनी शिवाजीनगर-कोपर येथील सुरू असलेले कामकाज चार तास बंद पाडले. प्रकल्प अधिकाऱ्यांनी सहा महिन्यांत मागण्यांची पूर्तता करण्याचे दिलेल्या आश्वसनानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.
न्हावे शिवडी सागरी सेतुबाधित न्हावा ग्राम पंचायत हद्दीतील शेकडो मच्छीमारांना होणारी नुकसान भरपाई देण्यात यावी, भविष्यात होणाऱ्या टोल नाक्यावर तसेच ब्रिजवर नोकर भरतीत प्राधान्य मिळावे, न्हावा शिवडी सागरी सेतु पूर्णत्वास झाल्यानंतर सुरू होणाऱ्या टोल वसुलीतून न्हावा ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना टोल माफी मिळावी, तसेच एमएमआरएडीए आणि टाटा कंपनीच्या सीएसआर फंडातून न्हावा ग्राम पंचायतीच्या विकासाकरता निधी उपलब्ध करून देण्यात यावा आदी मागण्यांसाठी मंगळवारी शिवाजीनगर- कोपर येथील एमएमआरएडीए व टाटा कंपनीच्या कार्यालयावर ग्रामस्थांनी मोर्चा काढून जोरदार धडक दिली.
न्हावा ग्राम पंचायतीचे सरपंच जितेंद्र म्हात्रे, ग्राम सुधार मंडळांचे अध्यक्ष अशिष पाटील, माजी सरपंच हनुमान भोईर, चंद्रकांत भोईर, उप सरपंच किसन पाटील, न्हावे तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप ठाकुर, माजी उप सरपंच व सदस्य हरिश्चंन्द्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी प्रकल्पाचे सुरू असलेले कामकाज सुमारे चार तास बंद पाडले. त्यानंतर वठणीवर आलेल्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चाही केली. चर्चेनंतर उपस्थित एमएमआरएडीए अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांनी केलेल्या विविध मागण्यांची पूर्तता सहा महिन्यांत करण्याचे आश्वासन दिले. आश्वसनानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.


























































