पूर्णा नदीवर तीन बंधारे बांधणार : मुख्यमंत्र्यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेनगाव तालुक्यातील गोरेगावला अतिरिक्त तहसील कार्यालय सुरु करण्यासोबतच जवळाबाजार येथे 132 केव्हीचे वीज उपकेंद्र, पूर्णा नदीवर तीन बंधारे करण्याची घोषणा महाजनादेश यात्रेनिमित्त जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधानसभेवर भाजपा महायुतीचा भगवा पुन्हा फडकवून तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच शेतकऱ्यांचा सण असलेल्या पोळ्यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंगोलीत बैलांचे पूजन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली भाजपची महाजनादेश यात्रा हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी आली. हट्टा येथे या यात्रेचे स्वागत करण्यात आले. जवळाबाजार येथील सभेला संबोधीत करुन मुख्यमंत्र्यांची ही यात्रा औंढ्यात पोहचल्यावर स्वागत करण्यात आले. हिंगोलीच्या रामलीला मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली. त्यानंतर कळमनुरी, आखाडा बाळापुर, वारंगा फाटा येथे यात्रेचे भाजप कार्यकर्त्याचे स्वागत केले. जिल्ह्यात विविध ठिकाणी जनतेशी संवाद साधतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षात असतांना संघर्ष यात्रा तर सत्ताधारी म्हणून ही संवाद यात्रा काढत आहोत. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढुन वातावरण बदलुन टाकले होते. नवीन तालुका निर्मितीसाठी राज्यात समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचा अहवाल आल्यावर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. मात्र, आमदार तानाजी मुटकुळे यांनी त्यांच्या भाषणात केलेल्या मागणीनुसार सध्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे अतिरिक्त तहसील कार्यालय सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ईव्हीएममध्ये नाही तर विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या डोक्यामध्येच बिघाड असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. या यात्रेसोबत उद्योग राज्यमंत्री व हिंगोलीचे पालकमंत्री अतुल सावे, आमदार सुजीतसिंग ठाकुर, आमदार तानाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आमदार गजाननराव घुगे, माजी खासदार शिवाजी माने, संघटनमंत्री रेणुकादास देशमुख आदी सहभागी झाले होते. माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केला.