
रायगड जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या नेरळ ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. नेरळ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत 72 टक्के मतदान झाले. ग्रामपंचायतच्या निवडणूकीत किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले असून 48 उमेदवार यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.दरम्यान,आता 3 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार असून ऐन गणेश उत्सव काळात नेरळ मध्ये कोण फटाके वाजविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शनिवारी सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने मतदानाचा टक्का दुपार पर्यंत कमी होता. त्यानंतर दुपारी पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. त्या काळात मतदानाचा टक्का वाढत होता, मात्र त्यावेळी चार वाजल्यापासून पाऊस पुन्हा सुरू झाला आणि उमेदवारांची धाकधूक पुन्हा वाढली. मतदान संपेपर्यंत पावसाचा जोर कमी झाला होता. त्यावेळी प्रभाग दोन आणि सहा मध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांनी रांगा लावल्याने साडे पाच नंतर देखील या दोन प्रभागात मतदान सुरू होते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्वात कमी मतदान प्रभाग 5 मध्ये झाले असून तेथे 64.27टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.तर सर्वात जास्त मतदान हे आदिवासी समाजाचे मतदार असलेल्या प्रभाग एक मध्ये 85.84 टक्के इतके झाले. नेरळ ग्रामपंचायत मध्ये असलेल्या एकूण 13899 मतदारांपैकी मतदारानी आपला मतदानाचा अधिकार बजावला असून त्याची टक्केवारी 72 टक्के इतकी झाली आहे.
शनिवारी निवडणूक झाली असून नेरळ ग्रामपंचायतची निवडणूक लढविणाऱ्या सर्व 48 उमेदवार यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. त्यात थेट सरपंच पदासाठी 4 आणि 17 जागांसाठी सहा प्रभागात 44 उमेदवार यांनी ही निवडणूक लढविली आहे. आता 3 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार असून कर्जत तहसील कार्यालयात होणार आहे. मतमोजणी ही ऐन गणेशोत्सव काळात असून कोण विजयी होणार आणि फटाके वाजविणार?याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.






















































