‘बीएसएनएल’ देणार 80 हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी  दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) तब्बल 70 ते 80 हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती  देणार आहे. ‘बीएसएनएल’ तोटय़ात असून, आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने हा निर्णय घेण्यात येणार आहे.

‘बीएसएनएल’चे चेअरमन प्रविणकुमार पुरवार यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. ‘बीएसएनएल’मध्ये मनुष्यबळ जास्त आहे. महसूलातील 75 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होते. 70 हजार ते 80 हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी कामगारांना आकर्षक पॅकेज दिले जाईल. 80 हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती दिल्यानंतरही ‘बीएसएनएल’कडे एक लाख कर्मचारी  उरतात. ही संख्या पुरेशी आहे असे पुरवार यांनी सांगितले.

जमीन, टॉवर्स भाडय़ाने देणार

‘बीएसएनएल’चे देशभरात अनेक भूखंड आहेत. हे भूखंड भाडय़ाने देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यातून 200 कोटी रूपये मिळतील. 12 ते 15 महिन्यात महसुलामध्ये एक हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ होईल. ‘बीएसएनएल’चे 68000 टॉवर्स आहेत. 13 हजार ते 14 हजार टॉवर्स भाडय़ाने दिले जाणार आहेत.

‘फोर जी’ स्पेक्ट्रम नसल्याने नुकसान

50 टक्क्यांपेक्षा अधिक महसूल डाटा सर्व्हीसमधून येतो. त्यामुळे डाटा महत्त्वाचा आहे.  ‘बीएसएनएल’ला ‘फोर जी’ स्पेक्ट्रम लवकरात लवकर मिळावे, यासाठी बीएसएनएल प्रयत्न करणार आहे. वीजेवर 2700 कोटी रूपये खर्च होतात. 15 टक्के वीज बचत करण्याचे  प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर इतर खर्च कमी केला जाणार आहे.