शासनाची शिपाई पदाची भरती आता कंत्राट पद्धतीने; मुंबईच्या कंपनीला पहिले कंत्राट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहकार व वस्त्रोद्योग विभागाने शिपाई भरती कंत्राट पद्धतीने करण्याचे पहिले कंत्राट मुंबईच्या अल्फाकॉम सर्व्हिसेस कंपनीला दिले आहे. आता यापुढे राज्याच्या सर्व शासकीय कार्यालयात शिपाई पदाची भरती कंत्राट पद्धतीने होणार आहे. आता शासनाने शिपाई या पदाची भरतीसुद्धा कंत्राटी पद्धतीने करण्याचे ठरविले असून सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागासाठी लागणार्‍या शिपाई पदासाठी शासनाने शिपायांच्या सेवा पुरविण्यासाठी कंत्राटदार निश्चितीसाठी ई-निविदा मागविली होती. त्यानुसार प्राप्त निविदांमधून लघुत्तम दराची निविदा अल्फाकॉम सर्व्हिसेस इंडिया, बी-105/बी विंग, कैलाश एस्पलांडे, घाटकोपर (वेस्ट) मुंबई या संस्थेची निवड केली आहे.

आता 9,499 रुपये मासिक वेतनावर सहकार व पणन विभागाला 1 सप्टेंबर 2019 पासून कंपनी एक वर्षासाठी शिपाई पुरवणार आहे. पगाराव्यतिरिक्त सुद्धा सायंकाळी 7 ते 8 काम केल्यास 24 रुपये अतिरिक्त भत्ता, रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत काम केल्यास 30 रुपये अतिरिक्त भत्ता व रात्री नऊ नंतर काम केल्यास 40 रुपये अतिरिक्त भत्ता व पगार 9,499 रुपये देण्यात येणार आहे. कंत्राटदार शिपाई पदावर काम करणारा देशाचा नागरिक तसेच किमान चौथी पास असावा. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष असावी, असे नियम घालण्यात आले असून कामकाजाची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठेवली आहे. दोनशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करुन देणे बंधनकारक केले आहे. शासनाने शिपाई पदाची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा हा पहिला आदेश 29 ऑगस्ट 2019 रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव डॉ. सुदीन गायकवाड यांच्या स्वाक्षरीने जारी केला आहे.