
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचा निवडणूक खर्च आणि काळ्या पैशाचा वापरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे तसेच पैशाच्या वापरावर आळा घालण्यासाठी अंतर्गत माहिती यंत्रणा सक्षम करून अशा प्रकरणात तत्काळ छापे आणि जप्तीची कारवाई करावी असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी आज दिले.
राज्यात आगामी विधानसभा निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आढावा घेण्यासाठी उमेश सिन्हा यांच्यासह निवडणूक आयोगाचे अन्य उपनिवडणूक आयुक्त संदीप सक्सेना, सुदीप जैन, चंद्रभूषण कुमार, महासंचालक दिलीप शर्मा, धीरेंद्र ओझा मुंबईत आले आहेत.
जनजागृती करणार
दरम्यान, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती वाहनाचे वरिष्ठ उपनिवडणूक अधिकारी उमेश सिन्हा आणि अन्य उपनिवडणूक आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रात अत्यंत शांततापूर्ण निवडणुका पार पडतात असे प्रारंभीच सांगून सिन्हा म्हणाले की, राज्याला शांततेचा इतिहास असला तरी संपूर्ण सावधानता बाळगून सर्व तयारीनिशी निवडणुकीला सामोरे जायचे आहे.
सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱया मजकुरावर वॉच ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मुख्य सचिव अयोज मेहता यांच्या दालनात मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिकाऱयांशी संपर्क साधून आढावा घेतला आणि सूचना दिल्या.
























































