मुंबई सेंट्रलमध्ये एसटीचा 49 मजली टोलेजंगी टॉवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई सेंट्रल येथे एसटी महामंडळाच्या मुख्यालयाचा पुनर्विकास करण्यात येणार असून येथे तब्बल 49 मजल्यांचा टोलेजंग टॉवर उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी मुंबई सेंट्रल येथे झाले. येथे 468 कोटी रुपयांमधून एक हेक्टर जागेवर तब्बल 49 मजल्यांची इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीतील 15 ते 49 मजले शासनाच्या विविध कार्यालयांना भाडय़ाने देण्यात येणार असून त्यातून एसटी महामंडळाला दर महिन्याला 16.17 कोटी रुपयांचे वेतन मिळणार आहे.

मुंबई सेंट्रल बस आगाराच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन आणि ‘शिवाई’ विद्युत बसचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथे गुरुवारी एका शानदार सोहळ्यात झाल. याप्रसंगी परिवहनमंत्री व महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष रणजित सिंह देओल आदी मान्यवर उपस्थित होते. या टोलेजंग इमारतीमध्ये एकूण 1 लाख 23 हजार चौरस मीटर इतके बांधकाम क्षेत्र उपलब्ध होणार आहे. तळमजल्यावर उपाहारगृह, पहिला ते आठव्या मजल्यापर्यंत वाहनतळ, 9 ते 14 व्या मजल्यापर्यंत एसटीचे मध्यवर्ती कार्यालय, 15 ते 49 मजल्यापर्यंत विविध शासकीय कार्यालये भाडय़ाने देण्याचे प्रस्तावित आहे.

प्रदूषणमुक्त बससेवेचा आदित्य ठाकरेंचा आग्रह
एसटीत प्रदूषणमुक्त बॅटरीवर चालणारी बस धावावी यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आग्रह धरला होता. त्यामुळे केंद्राच्या या योजनेतून ही बस चालवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असल्याचे परिवहनमंत्री व महामंडळाचे उपाध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱयांना 12 हजारांपर्यंत पगारवाढ मिळाली. तसेच 2 लाख 35 हजार रिक्षा नव्याने आल्या असून 2 लाख 60 हजार परवाने तसेच तीन लाख बॅज काढण्यात आल्याने रोजगारात वाढ झाल्याचे रावते यांनी सांगितले.

आगीतून प्रवाशांना वाचवणाऱ्यांचा गौरव
मुंबई ते चिपळूण-दहिवली मार्गावर जळत्या एसटीमधून प्रवाशांना वाचवणाऱया इचलकरंजीचा चालक दिनेश जगधणे आणि वाहक संतोष माळी यांचे उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक हजार घरे
कुर्ला येथे एसटीची 10.33 एकर जागेवर 12 मजली दोन इमारती बांधण्यात येणार असून एसटी कर्मचाऱयांसाठी एक हजार घरे राखीव असून 350 घरे विकासक बांधून देणार आहे. या इमारतीत कर्मचाऱयांसाठी वन बीएचकेच्या 118 सदनिका बांधण्यात येणार आहेत. येथे कर्मचाऱयांच्या पाल्यांसाठी अत्याधुनिक शाळा उभारली जाणार असून विकासकाकडून व्यावसायिक तत्त्वावर चालविण्यात येणाऱया या शाळेमध्ये 50 जागा या एसटी कर्मचाऱयांच्या मुलांसाठी राखीव असणार आहेत.

एसटीच्या ताफ्यात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बस
एसटीच्या ताफ्यात बॅटरीवर धावणारी इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे. दोन शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस धावण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाच्या रूपाने होणार आहे. सुरुवातीला बोरिवली ते स्वारगेट, नंतर पुणे ते नाशिक, पुणे ते संभाजीनगर आणि पुणे ते कोल्हापूर मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
केंद्राच्या फेम-2 योजनेनुसार 150 वातानुकूलित इलेक्ट्रिक बस मिळणार.
या बसची लांबी 12 मीटर असून रुंदी 2.6 मीटर तर उंची 3.6 मीटर आहे.
आसन क्षमता ही 43 + 1 इतकी आहे.
पुशबॅक स्वरूपाची आरामदायी आसने आहेत.
एकदा चार्ज केल्यावर 300 कि.मी. चा पल्ला गाठणार.
चार्जिंगसाठी किमान 1 ते 5 तास (एक तास जलद चार्जिंग).
सर्वसाधारण चार्जिंग 3 ते 5 तास.
322 किलो वॅट क्षमतेची लिथियम आयर्न फॉस्फेटची बॅटरी.
बसला 36 किलोवॅट क्षमतेची वातानुकूलित यंत्रणा.
शिवशाहीपेक्षा जास्त, शिवनेरीपेक्षा कमी चालन खर्च.