डायनॉसोरसच्या डोक्यात होते नैसर्गिक एअर कंडिशनर ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाखो वर्षांपूर्वी जमिनीवर असणाऱ्या अजस्त्र आकाराच्या डायनॉसोरसच्या डोक्यामध्ये नैसर्गिक वातानुकूलन क्षमता होती, असं एका वैज्ञानिक अहवालात सिद्ध झालं आहे. ट्रायनॉसोरस रेक्स उर्फ टी-रेक्स असं वैज्ञानिक नाव असलेल्या या डायनॉसोरसच्या जीवाश्माचा अभ्यास करताना मिसुरी येथील विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे.

या आधी टी-रेक्सच्या कवटीचा अभ्यास करताना ती विविध प्रकारच्या स्नायूंनी परिपूर्ण असावी, जेणेकरून त्याला जबड्याची हालचाल करणं सोपं जावं, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. पण, शास्त्रज्ञांनी त्याच्या कवटीत एक वैशिष्ट्यपूर्ण रचना पाहिली, ज्यामुळे त्याच्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी त्याच्या कवटीतच योजना करण्यात आली असावी असा निष्कर्ष निघाला. टी रेक्सच्या अजस्त्र जबड्याच्या मुख्य स्नायूची वाढ त्याच्या कवटीच्या दिशेने झालेली असून तो स्नायू जबड्याच्या हाडानंतर 90 अंशांनी वळत थेट कवटीच्या सर्वात वरच्या भागाकडे गेलेला त्यांना आढळला. टी- रेक्स हा सरिसृप वर्गातील महाकाय प्राण्यांपैकी एक होता. त्यामुळे शास्त्रज्ञांनी फ्लोरिडा येथील सुसरीच्या कवटींचं परीक्षण केलं. त्यावेळी त्यांना अशीच रचना त्यांच्याही कवटीत असल्याचं आढळलं.

मगर किंवा सुसर हे सरिसृप वर्गातील थंड रक्ताचे प्राणी आहेत. शिकार करण्यापूर्वी त्यांना शरीर उन्हात तापवावे लागते आणि मगच ते शिकारीला पाण्यात उतरतात. पाण्याच्या थंडाव्यामुळे शरीर थंड पडू नये यासाठी त्यांच्या शरीरातील उष्णता शोषणारी छिद्रं बंद होतात. अशाच प्रकारे टी- रेक्स या प्राण्याच्या कवटीत दोन मोठी छिद्रं आहेत. तिथे रक्तवाहिन्या आणि स्नायूंची अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना होती, की जेव्हा वातावरण तापेल तेव्हा ती बंद होऊन शरीरातील थंडावा कायम राहू शकेल. शरीराला उष्ण किंवा थंड करण्याची ही खासियत सुसरींमध्ये आजही आढळते. त्यावरून शास्त्रज्ञांनी टी-रेक्स या महाकाय प्राण्याच्या डोक्यात एक नैसर्गिक वातानुकूलन यंत्रणा असल्याचा निष्कर्ष काढला आहे.