शेतमालाच्या नुकसान भरपाईसाठी कामरगावला ‘रास्तारोको’ आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निंबळकमध्ये 2017 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कामरगाव येथील 101 शेतकऱ्यांच्या फुलशेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. याची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी नगर-पुणे महामार्गावरील कामरगाव येथील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे याच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता ‘रास्तारोको’ आंदोलन केले . कामरगाव ( ता. नगर ) येथील शेतकऱ्यांचे दोन वर्षापूर्वी फळबागांचे नुकसान झाले होते. कृषी विभागाने वस्तुनिष्ठ पंचनामे करून वरिष्ठांकडे अनुदान मागणीसाठी प्रस्ताव दिला होता. दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला असून अजूनपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे व संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ठोकळ यांनी वारंवार कृषी व तहसील कार्यालयाकडे पाठपुरावठा केला होता. तरीही प्रशासनाने लक्ष दिलेली नाही.

प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नगर-पुणे रस्त्यावर कामरगाव तालुका नगर येथे रास्तारोको आंदोलन केले. आंदोलकांच्या वतीने कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी वरीष्ठ पातळीवरून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. गेल्या दोन वर्षांपासून नुकसान भरपाईची मागणी करत आहोत. कृषी व तहसील या विभागात समनव्य नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर यावे लागले. यापुढे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी, असे तुकाराम कातोरे यांनी सांगितले.

यावेळी जि. प. सदस्य संदेश कार्ले, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे, सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ठोकळ, गणेश साठे, साहेबराव ठोकळ , सुरेश ठोकळ, यांनी मनोगत व्यक्त केले. या सर्वानी मागणी मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला. आंदोलनात शिवाजी साठे, पोपट ठोकळ, श्याम आंधळे, सुनिल चौधरी यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक जारवाल, गुप्त वार्ता विभागाचे रावसाहेब खेडकर यांनी चोख बंदोबस्त ठेवीत आंदोलन शांततेत पार पाडले.