परळीच्या मालेवाडी गावातील 200 वर्षांपासून गौरीपूजनाची अनोखी पंरपरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवात सगळीकडे घरोघरी गौरीस्थापना करण्यात आली. मात्र, परळी तालुक्यातील मालेवाडी या गावात मात्र गौरीपूजनाची अनोखी परंपरा आहे. परळी तालुक्यातील मालेवाडी गावात 200 वर्षांपासुन ‘एक गाव एक गौरी’ अशी परंपरा चालत आलेली आहे. डोंगर कपारीत वसलेल्या या गावात महालक्ष्मीचे मोठे मंदिर आहे.

सुमारे 200 वर्षांपूर्वी मालेवाडी येथील बदणे यांच्या स्वप्नात महालक्ष्मीने दर्शन देत मी तुमच्या वाड्यात रेड्याच्या पाठीमागे आली आहे असे सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वाड्यात तांदळासारखे तीन मोठे दगड दिसले.त्यांची विधीवत स्थापना केल्यानंतर त्या महालक्ष्मीने पुन्हा साक्षात्कार देत मला मोकळ्या सार्वजनिक ठिकाणी स्थापित करा असे सांगीतले तेव्हापासून मालेवाडी येथे घरोघरी महालक्ष्मीचा उत्सव साजरा करण्याऐवजी संपूर्ण गाव या महालक्ष्मी मंदिरातच गौरी सण साजरा करु लागले. सर्व कुटुंब गौरी पुजनासाठी मालेवाडीत येतात.प्रत्येक कुटुंबाला पुजेसाठी वेळ दिला जातो सर्वात शेवटी ज्यांच्या पूर्वजांना साक्षात्कार झाला त्या भुराजी बदणे यांच्या कुटुंबीयांकडुन पूजा केली जाते.पुजेच्या दिवशी गावातील व बाहेरुन आलेल्या महिला एकत्रित येतात.त्यामुळे या गावात कोणाच्याही घरी गौरीपूजन होत नाही. सर्वच गावकरी एकत्र येऊन या मंदिरात असलेल्या गौरींची सजावट करुन प्रत्येकजण आपआपली पुजेचे साहित्य आणून मंदिरातच कलशस्थापना करुन तीन दिवस लक्ष्मीमातेची पूजा करतात.मालेवाडी गावातून स्थलांतरीत झालेल्या मरळवाडी व इतर ठिकाणचे ग्रामस्थही ही आपल्या घरी गौरी स्थापना न करता मालेवाडी येथे लक्ष्मीची पूजा करतात.

मालेवाडी गावात साक्षात लक्ष्मीमातेचे वास्तव्य असल्यामुळे या गावात एकाही घरी गौरी (लक्ष्मी) मूर्तीची स्थापना होत नाही.अथवा या गावातील मुलीचे लग्न झाले तरी तिच्या घरी ही गौरीची स्थापना करण्यात येत नाही. अशा माहेरवासीनींच्या घरी केवळ कलशस्थापना करुन लक्ष्मीमातेची पूजा करण्यात येते. आधुनिक काळातही 200 वर्षांपासून सुरू झालेली ही परंपरा जोपासण्यात येत आहे. हे गाव सोडून मरळवाडी येथै वास्तव्यास गेलेल्या देवराव आंधळे यांच्या पत्नीने लक्ष्मी (गौरी) स्थापनेचा प्रयत्न केला होता. परंतु, उभे केलेले मखर अचनाक आग लागून जळून गेले होते. त्यानंतर असा प्रयत्न कोणीही केला नाही,अशी माहिती गोपाळ आंधळे यांनी दिली.