
रत्नागिरी शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज रत्नागिरी नगर परिषदेच्या आवारात छत्री आंदोलन छेडले. आंदोलनानंतर शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख आणि प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी नागरिकांच्या भावनांचा आदर व्यक्त करत अतिवृष्टीमुळे हे खड्डे पडले आहेत. आम्ही खड्डे बुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मात्र गेला आठवडाभर रत्नागिरीत अतिवृष्टी सुरु आहे.त्याअतिवृष्टीमुळे पुन्हा खड्डे पडले आहेत.संबधित ठेकेदारांकडून जोपर्यंत सर्व खड्डे भरून होणार नाहीत तो पर्यंत ठेकेदाराला एक पैसा अदा करणार नाही असा शब्द प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे.
राजीव कीर यांच्या नेतृत्वाखाली आज रत्नागिरी नगर परिषदेबाहेर नागरिकांनी छत्री आंदोलन छेडले.याआंदोलनात नागरिक काळ्या रंगाच्या छत्र्या घेऊन आले होते. आंदोलन सुरू असतानाच प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी हे नगरपरिषदेतून बाहेर येऊन आंदोलनकर्त्या नागरिकांना सामोरे गेले. राजीव कीर यांनी प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांना निवेदन सादर करून रस्त्यावरील खड्डे भरण्याची मागणी केली. यावेळी अभिजीत हेगशेट्ये, नंदकुमार साळवी, नदीम सोलकर, सुखदा देव, मुकुंद जोशी व इतर नागरिक उपस्थित होते.
निवडणूका जवळ आल्याने काही लोकांचे राजकारण
त्यानंतर पत्रकार परिषदेत प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी आपली बाजू नागरिकांसमोर मांडताना,सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत.आम्ही ऑगस्ट महिन्यात खड्डे बुजवायला सुरुवात केली होती.पण गेले आठ दिवस पुन्हा अतिवृष्टी सुरु असल्याने पुन्हा खड्डे पडले.नागरिकांना होणारा त्रास आम्हालाही जाणवतो.तसेच रत्नागिरी शहरातील खड्डे बुजविण्यासाठी 50 लाखाचे टेंडर काढले नसून ते टेंडर 33 लाखाचे आहे.तसेच त्या ठेकेदाराला अद्याप एकही पैसा अदा करण्यात आलेला नसून जोपर्यंत खड्डे भरून रस्ता पुर्ण होत नाही तोपर्यंत त्या ठेकेदाराला एक पैसाही अदा केला जाणार नसल्याचे साळवी यांनी स्पष्ट केले.काही लोक निवडणूकाजवळ आल्या म्हणून राजकारण करत असल्याचा आरोप प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी केला.




























































